
- लोहपुरुषाच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त जनएकतेचा भव्य संदेश
नंदुरबार, 19 नोव्हेंबर (हिं.स.)नवापूर लुक्यातील खांडबारा येथे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत जिल्हा प्रशासन आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त “सरदार@150 एकता पदयात्रे”चे भव्य आयोजन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडले. ही पदयात्रा नागरिकांच्या देशभक्ती, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची जणू प्रत्यक्ष साक्ष देत होती. मान्यवरांच्या उपस्थितीत पदयात्रेचा शुभारंभ
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, जिल्हा युवा अधिकारी भुषण
पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सरदार पटेलांच्या विलक्षण कार्याची उजळणी करत
“राष्ट्र एकता, स्वावलंबन आणि अखंडतेचा मार्ग सरदारांनी दाखवला” असे सांगत त्यांच्या प्रेरणादायी
जीवनमूल्यांचे स्मरण करून दिले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी “आत्मनिर्भर भारत”
संकल्पाची शपथ घेतली.
विजेत्यांचा गौरव
कार्यक्रमात चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेते तसेच सांस्कृतिक नृत्य पथकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात
आले. या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या कलेला नवा आयाम मिळाला आणि कार्यक्रमाला अधिक प्रेरणादायी
स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते “सरदार @ 150” अभियानाचे पोस्टर अनावरण करण्यात
आले. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून एकता पदयात्रेला औपचारिक सुरुवात झाली.
600 हून अधिक स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग
माय भारत, राष्ट्रीय सेवा योजना, युवक मंडळे आणि परिसरातील नागरिक मिळून सुमारे 600 स्वयंसेवकांनी
या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांनी सांस्कृतिक नृत्य सादरीकरण करून वातावरण
देशभक्तीमय केले. घोषवाक्ये, देशभक्तीपर गीतांनी आणि सांस्कृतिक वेशभूषेने खांडबारा परिसर दुमदुमून
गेला.
स्वच्छतेच्या संदेशातून सेवेची नवी उमेद
पदयात्रेनंतर स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवून समाजसेवेचा संदेश देत या कार्यक्रमाला अधिक अर्थपूर्ण
बनवले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाने मोठी भूमिका बजावली.
शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य
या संपूर्ण उपक्रमासाठी शिक्षण विभाग तसेच अग्रीकल्चर हायस्कूल व जुनियर कॉलेज, खांडबारा यांचे विशेष
सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. मनोज शेवाळे यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी
अविनाश कोकणी, गणेश इशी आणि अक्षय अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
राष्ट्रएकतेचा दृढ संदेश
“सरदार@150 एकता पदयात्रा” हा केवळ कार्यक्रम नव्हता; तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अप्रतिम
राष्ट्रधर्म, एकात्मता आणि कर्तृत्वाचा जनमानसात प्रकाश पाडणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरला. या
पदयात्रेद्वारे राष्ट्राच्या एकतेचा संदेश अधिक दृढ होत“एक भारत श्रेष्ठ भारत” या स्वप्नाला नवशक्ती मिळाली,
असे जिल्हा युवा अधिकारी भुषण पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर