
नांदेड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कर्जबाजारी आदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपले जीवन आत्महत्या करून संपविण्याचा मार्ग पत्करला. नांदेड जिल्ह्यात २४ डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती जिल्हास्तरीय कार्यालयाच्या प्राप्त प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील लोहा तालुक्यात १९ व हदगाव तालुक्यात १७ अशी संख्या आहे.
जिल्ह्यातील शेती निसर्ग पावसाच्या लहरीपणावर मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्यास पीकाचे अतोनात नुकसान होते. पाऊस योग्य झाला अन् पीकाचा उतारा चांगला आला तरी मालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत, लागवड, संगोपन, काढणी, मळणी आदीवर झालेला खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नाही. मग शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. आर्थिक चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हयात १४५ शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २० २५ या कालावधीत आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील १४५ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणात समितीने ८३ प्रस्ताव पात्र ठरविले आहेत. आणि ८ प्रस्ताव अपात्र केले आहेत. प्रलंबित असलेले प्रस्ताव ५४ असल्याचे समजते. शेतकरी आत्महत्या केलेली सर्वाधिक संख्या लोहा तालुक्यात १९ असून हदगाव तालुक्यात १७ संख्या आहे. जिल्ह्यात सर्वात कमी संख्या धर्माबाद तालुक्यात अवघी १ आहे. आणि उमरी ३ व देगलूर तालुक्यात सुद्धा ३ संख्या आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis