
नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुणे जिल्ह्यात बिबट्या निर्बीजीकरणाच्या पायलट प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता देत ११ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतर आता नाशिकमध्येही हा प्रकल्प तातडीने सुरू करण्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे यासाठी ठोस पाठपुरावा सुरू केला आहे.
खासदार वाजे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पाठविलेल्या पत्रात नाशिकमध्ये बिबट्या–मानव संघर्ष वाढत असल्याचा मुद्दा मांडत निर्बीजीकरण प्रकल्पाचा पुढील टप्पा नाशिकमध्येच सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच ए आयआधारित पूर्वसूचना पद्धती, जलद प्रतिसाद दल, अतिरिक्त पिंजरे आणि “लेपर्ड सफारी व संरक्षण प्रकल्प” स्थापन करण्यासही परवानगी देण्याची विनंती त्यांनी केली.राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनाही खासदार वाजे यांनी पाठवलेल्या पत्रात नाशिकमध्ये संसाधनांची कमतरता गंभीर असल्याचे सांगत पिंजऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली.दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकासकामांना निधी न मिळाल्याची खंत व्यक्त करत खासदार वाजे यांनी “आपत्ती व्यवस्थापन निधीतून” तातडीने किमान १ हजार पिंजरे, ड्रोन आणि रेस्क्यू साहित्य खरेदी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV