मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी सहा तास राहणार बंद
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 नोव्हेंबर रोजी सहा तासांसाठी विमानसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सका
Mumbai International Airport


मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 नोव्हेंबर रोजी सहा तासांसाठी विमानसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या वापरासाठी अनुपलब्ध राहतील. दररोज सुमारे 950 उड्डाणे हाताळणाऱ्या या विमानतळावर वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीची महत्त्वाची कामे नियोजित असल्याने ही बंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, मान्सूननंतरची नियमित रनवे देखभाल ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मानकांनुसार दरवर्षी केली जाते. यंदा पावसाळा जास्त काळ टिकल्यामुळे विमानतळ परिसरात सुमारे 400 मिमी पावसाची नोंद झाली. धावपट्टीवर पाणी साचल्याने तीच्या पृष्ठभागावर नुकसान होण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे रनवे 09/27 आणि 14/32 यांचा संपूर्ण तपास, पृष्ठभाग दुरुस्ती, लायटिंग, मार्किंग आणि ड्रेनेज सिस्टीमचे बारकाईने निरीक्षण या कालावधीत करण्यात येणार आहे.

या कामांच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांनी नियोजित उड्डाणे रद्द केली असून काहींनी मुंबईऐवजी पर्यायी विमानतळांवर विमाने उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने आधीच नोटिस टू एअरमेन जारी करून एअरलाइन्स आणि ग्राउंड हँडलर्सना वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

प्रवाशांनी या कालावधीत आपली फ्लाइट स्थिती एअरलाइन्सच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्या फ्लाइट्स या बंदीच्या वेळेत येत असतील त्यांनी पर्यायी वेळा किंवा पर्यायी प्रवासाची तयारी करावी. धावपट्टी बंदीच्या वेळेपूर्वी आणि नंतर विमानतळ परिसरात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी अतिरिक्त वेळ राखूनच प्रवासाची योजना आखावी, असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande