
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर अवकाळी पावसाचा जोर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहिला. मात्र पावसानं आता उसंत घेतल्याने राज्यभर थंडीची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत थंडीत लक्षणीय वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांत तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. थंडीच्या या झंझावातात मुंबईत 19 नोव्हेंबरला गेल्या 11 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद केली आहे.
मुंबईतील कालची सकाळ ही विशेषत: थंडगार ठरली. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, जे मागील 11 वर्षांतील सर्वांत नीचांकी आहे. तर कुलाबा येथे किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कुलाबा वेधशाळेतील हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी या तापमानातील घसरणीची माहिती देताना, नोव्हेंबरच्या मध्यावर थंडी इतक्या वेगाने वाढणे ही लक्षणीय बाब असल्याचे सांगितले.
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनीही सोशल मीडियावर विशेष पोस्टद्वारे मुंबईत नोंद झालेल्या या कमी तापमानाची पुष्टी केली आहे. त्यांच्या मते, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकणात थंडीची तीव्रता वाढत आहे.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर हवेतल्या आर्द्रतेत घट झाली असून उत्तरेकडील कोरड्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तापमानात अशी घट होत असल्याचे हवामान विभागाच्या निरीक्षणांतून समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना काल सकाळी गारठ्याचा प्रत्यय आला आणि पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule