
मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व मधून मुंबईत राबवण्यात आलेला ‘सुविधा केंद्र’ उपक्रम आदर्श मॉडेल ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडल्या जात आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त भागीदारीत सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीत मोठे परिणाम साधले आहेत. सध्या मुंबईत २३ केंद्रे कार्यरत असून, लवकरच २४ वे केंद्र सुरू होणार आहे. मुंबईत आणखी २ केंद्रे बांधकामाधीन असून ७ केंद्रांचे प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचएसबीसी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही योजना पुढील काही वर्षांत अधिक विस्तारणार आहे.
शहरातील झोपडपट्टी आणि वंचित वस्त्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणाऱ्या स्वच्छता सुविधा देण्याचे उद्दिष्ट या केंद्रांमागे आहे. ५.५ लाख नागरिकांना आतापर्यंत याचा प्रत्यक्ष लाभ झाला असून, आरोग्यदृष्ट्यादेखील हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुविधा केंद्रे ही स्वच्छतेच्या शाश्वत व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण घटक असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात आणखी सुविधा केंद्रे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरात ‘सुविधा केंद्र’ मॉडेलने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उत्तम कामाचे उदाहरण निर्माण केले आहे. ही केंद्रे शहराच्या आरोग्यसुरक्षेत मोठे योगदान देत आहेत. या सुविधा केंद्रामध्ये उत्तम सुविधा, लोकांचा सहभाग, वर्तणूक बदल, आर्थिक आणि पर्यावरण टिकाव आणि कार्यक्षम संचालन यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे सर्व अत्यंत उल्लेखनीय असून हा उपक्रम शहरी महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
सुरक्षित आणि सन्मानजनक स्वच्छता
झोपडपट्टी व अनौपचारिक वसाहतींतील महिलांसाठी सुरक्षित शौचालय, मुलांसाठी स्वच्छ जागा, दिव्यांगांसाठी सुलभ रचना — या सर्व बाबींमुळे सुविधा केंद्रे अत्यंत लोकाभिमुख झाली आहेत.
पर्यावरणपूरक मॉडेल
जल-बचत तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता आणि कचरा व्यवस्थापन यामुळे पर्यावरणीय शाश्वततेचा उत्तम नमुना तयार झाला आहे.
समुदायातील महिलांचा सहभाग
प्रशिक्षित ३०० महिलांनी राबवलेल्या वर्तनबदल मोहिमेमुळे ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण मिळाले. यामुळे नागरिकांच्या सवयी, वापर आणि आरोग्य-जाणीवेत सकारात्मक बदल घडला.
आरोग्यदायी परिणाम
‘सुविधा केंद्रां’मुळे जठरांत्र, अतिसार आणि मूत्रमार्गाच्या संक्रमणात ५० टक्के घट झाली आहे. झोपडपट्टी क्षेत्रातील सर्वाधिक समस्या असलेल्या दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे होणारे आजार आता लक्षणीयरित्या कमी झाले आहेत.
आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण मॉडेल
सुरुवातीपासून ९ महिन्यांत केंद्र स्वतःचा खर्च भागवू लागते ही या योजनेची मोठी ताकद आहे. आज मुंबईतील सर्व २३ केंद्रे पूर्णपणे स्वयं-टिकाऊ आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर