नागपूर : भांडेवाडीत बिबट्याचा शिरकाव; चार तासांच्या ऑपरेशननंतर पकडले
नागपूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील एका निवासी इमारतीत आज, बुधवारी सकाळी बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दाट लोकवस्ती असलेल्या भागातील या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वाताव
बिबट्याचे संग्रहित छायाचित्र


नागपूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील एका निवासी इमारतीत आज, बुधवारी सकाळी बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दाट लोकवस्ती असलेल्या भागातील या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

भांडेवाडीत बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमाराला एका लहान मुलाला त्यांच्या घरात बिबट्याची शेपटी दिसली. कुतूहलाने त्याने चप्पल फेकून मारत तपास केला असता हालचाल दिसल्याने त्याने तातडीने ही माहिती घरच्यांना दिली. कुटुंबीयांनी पाहणी केली असता घरात खरोखरच बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आणि क्षणातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटना कळताच स्थानिकांनी “हेल्प फॉर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर” ला संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली आणि हा बिबट्या असल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाच्या टीटीसी सेंटरला कळविण्यात आले. पोलिसांनी परिसर सील करून नागरिकांना अंतर राखण्याचे आवाहन केले. वन विभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी जवळपास चार तास प्रयत्न केले. बिबट्या सतत हालचाल करत असल्याने पथकाला त्याच्याजवळ जाणे कठीण जात होते. अखेर अनुभवी अधिकाऱ्यांनी योग्य क्षण साधत बिबट्याला सिंगल डार्टने बेशुद्ध केले. त्यानंतर प्राथमिक तपासणी करून त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात ठेवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या जखमी नसून त्याला पुढील उपचारासाठी टीटीसी सेंटरमध्ये पाठवण्यात आले.

बिबट्या भांडेवाडी सारख्या गजबजलेल्या भागात नेमका कसा पोहोचला, तो कोणत्या क्षेत्रातून शहरात आला याचा तपास वन विभाग करीत आहे. मात्र, योग्य वेळी घेतलेल्या समन्वयात्मक कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande