
विजयवाडा, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : तब्बल 131 हून अधिक जवानांच्या हत्येचा आरोप असलेला कुख्यात नक्षलवादी ठिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीचा आज, बुधवारी आंध्रप्रदेशात खात्मा झालाय. पोलिसांशी झालेल्या चकमकीत देवजीसह 7 नक्षलवादी ठार झाले आहेत. आंध्र प्रदेश इंटेलिजन्सचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) महेश चंद्र लड्डा यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.
एडीजी महेश चंद्र लड्डा यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे सुरक्षा दल आणि नक्षली संघटनांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत सुमारे 7 माओवादी ठार झाले. त्यामध्ये तिरुपती उर्फ देवजी याचाही समावेश आहे. देवजी ओडिशा–आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात सक्रिय होता आणि नक्षल संघटनेने त्याची महासचिवपदी नियुक्ती केली होती. बस्तरमध्ये सुरक्षा दलांच्या शेकडो जवानांच्या हत्येमागे त्याचा हात असल्याचे आरोप होते. त्याच्या अटकेसाठी सरकारने 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त इनाम जाहीर केले होते.
आंध्रप्रदेशच्या मारेडुमिली वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत देवजी सोबतच श्रीकाकुलमचा जोगाराव उर्फ टेक शंकर याचाही समावेश असल्याचे लड्डा यांनी सांगितले. तसेच “माओवादी छत्तीसगड व तेलंगणातून आंध्र प्रदेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही काटेकोर पाळत ठेवली असून त्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवत आहोत. गेल्या 17 नोव्हेंबर रोजी आम्ही मोहीम सुरू केली. 18 नोव्हेंबरच्या सकाळी अल्लुरी सीतारामाराजू जिल्ह्यात चकमक झाली. यात केंद्रीय समितीचे सदस्य हिडमा माडवी आणि इतर 5 माओवादी ठार झाल्याचे एडीजी लड्डा यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे एनटीआर, कृष्णा, एलुरु, काकीनाडा आणि कोनासीमा जिल्ह्यांत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 3 विशेष प्रादेशिक समिती सदस्य, 23 प्लाटून सदस्य, पाच विभागीय समिती सदस्य आणि 19 क्षेत्र समिती सदस्यांचा समावेश आहे. या अटक कारवाईदरम्यान सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान लड्डा यांनी सांगितले की, मारेडुमिली येथील चकमकीनंतर काही माओवादी पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आल्याचे एडीजी लड्डा यांनी सांगितले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी