
पुट्टपर्थी, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : सत्य साईबाबांचे जीवन वसुधैव कुटुंबकम या विचरांचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आंध्र प्रदेशच्या पुट्टपर्थी येथे आयोजित सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी समारंभ कार्यक्रमात आज, बुधवारी पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू किंजरापू आणि जी. किशन रेड्डी उपस्थित होते.
याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्री सत्य साई बाबांचे जन्मशताब्दी वर्ष हे आमच्या पिढीसाठी केवळ उत्सव नाही, तर एक दिव्य वरदान आहे. आज ते शारीरिक रूपाने आपल्यात नसले तरी त्यांचे प्रेम, शिक्षण आणि सेवा-भावना आजही कोट्यवधी लोकांना मार्गदर्शन करत आहेत. सत्य साई बाबांचे संपूर्ण जीवन ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वाचे साकार रूप होते. त्यामुळे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सार्वभौम प्रेम, शांतता आणि सेवेचा एक महान उत्सव बनले आहे. आमच्या सरकारसाठी हे भाग्याचे आहे की या निमित्ताने 100 रुपयांचे स्मारक नाणे आणि विशेष टपाल तिकिट जारी करण्यात आले. या नाण्यांत आणि तिकिटांत त्यांच्या सेवाकार्याचे दर्शन घडते. सत्य साई बाबांचा संदेश हा केवळ पुस्तकांमध्ये, प्रवचनांमध्ये किंवा आश्रमांपुरता सीमित राहिला नाही. त्यांच्या शिकवणीचा परिणाम लोकांच्या जीवनात स्पष्टपणे दिसतो. भारतातील मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावापर्यंत, शाळांपासून ते आदिवासी वस्त्यांपर्यंत संस्कृती, शिक्षण आणि आरोग्यसेवेची अद्भुत परंपरा दिसून येते. बाबा यांच्या कोट्यवधी अनुयायांनी निरपेक्षपणे मानवी सेवेचे कार्य हाती घेतले आहे. ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ हा त्यांचा सर्वोच्च आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.
जेव्हा एखादे गरीब कुटुंब पहिल्यांदा सत्य साई रुग्णालयात येतो, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात की येथे बिलिंग काउंटरच नाही. जरी उपचार मोफत असले तरी रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही असुविधा होत नाही. आज येथे २० हजारांहून अधिक मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आणि सुरक्षित भविष्याची हमी मिळाल्याचे मोदींनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी 10 वर्षांपूर्वी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. ही देशातील अशा काही योजनांपैकी एक आहे ज्यामध्ये मुलींना सर्वाधिक म्हणजे 8.2 टक्के व्याजदर मिळतो. आतापर्यंत देशभरात 4 कोटींहून अधिक मुलींची खाती या योजनेखाली उघडली गेली आहेत. शेवटच्या आकडेवारीनुसार, या खात्यांमध्ये सव्वा 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. सत्य साई परिवाराने येथे 20 हजार सुकन्या समृद्धी खाती उघडण्याचे जे उदात्त कार्य केले आहे, ते अतिशय कौतुकास्पद असल्याचे मोदींनी सांगितले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड