
छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना स्थिर, दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा हा भावनिक संकल्प असून, गेल्या काही महिन्यांपासून विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून केलेल्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे.
अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे
मतदारसंघातील नूतन उपकेंद्र, अतिरिक्त रोहित्र बसवणे, क्षमतावाढ आणि विद्यमान उपकेंद्रांचे विस्तारकार्य यासाठी तब्बल 3,445.00 लाख रुपये म्हणजेच 34 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.आमदार लोणीकर म्हणाले की,या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघातील परतूर, मंठा, जालना ग्रामीण या विभागांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, ओव्हरलोडिंग कमी होणे, व्होल्टेज सुधारणा, शेतीपंपांना दर्जेदार वीज, औद्योगिक वाढ, ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा आणि भावी गरजांसाठी मजबूत पायाभरणी अशा अनेक सकारात्मक परिणामांना या कामांमुळे सुरुवात होणार आहे.
या मंजूर निधीतून पेवा येथे 33/11 केव्हीचे नवे उपकेंद्र (1x5 MVA) उभारण्यात येणार असून मंठा तालुक्यातील वाढत्या वहनक्षमतेच्या गरजा पूर्ण होतील. तसंच मंठा व परतूर उपविभागांतर्गत लोणी, श्रीष्टी, इडोळी, तळणी, खांडवी, पांगरी गोसावी, केंधळी, कोकाटे हातगाव, जयपूर, वरफळ, आष्टी, सातोना, शेवली, नेर या सर्व 33/11 केव्ही उपकेंद्रांवर 1x5 MVA किंवा 1x10 MVA क्षमतेची अतिरिक्त रोहित्रे बसविण्यात येणार असून त्यामुळे या परिसरातील वीज दाबातील चढ-उतार आणि ओव्हरलोडचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.याशिवाय परतूर आणि बढोणा उपकेंद्रांमध्ये 1x10 MVA अतिरिक्त क्षमतावाढ करण्यात येणार असून या दोन महत्त्वाच्या मुख्य केंद्रांना दीर्घकालीन बळकटी मिळणार आहे. परतूर आणि मंठा येथील 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांशी जोडलेल्या सर्व उपकेंद्रांवर या कामांचा थेट लाभ जाणवेल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis