
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)
आगामी अमरावती महापालिका निवडणूकीत मतचोरीची दाट शक्यता असून प्रशासनाने प्रत्यक्षात दर्शवलेली लोकसंख्या आणि गुरुवारी जाहीर होणारी मतदारांची संख्या यात मोठी तफावत असल्याने घोळ दिसून येत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड व पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी केला आहे.
उद्या २० नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर होणार आहे. परंतु त्यापूर्वीच मतदार यादी आमच्या हाती लागली असल्याचा दावा मुन्ना राठोड आणि समीर जवंजाळ यांनी पत्रकार परिषदेत केला. काही प्रभागात दोन ते तीन हजार मतदारांची संख्या कमी करण्यात आली आहे. काही प्रभागात संख्या फुगविण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या ९ वर्षांपासून महापालिकेवर भाजपचे नियंत्रण आहे. परंतु याच काळात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. मालमत्ता करात १० टक्के वाढ करण्यात आली. शहरात अस्वच्छता व घाणीच साम्राज्य आहे. अशावेळी मतदार यादीत कुठे मतदारात वाढ तर कुठे घट करण्यात आली आहे. अमरावती शहरातील २२ प्रभागात मतदारांमध्ये ही वाढ व घट करण्यात आली आहे. अधिकृत मतदार यादी जाहीर करण्यासाठी महापालिकेने तीन वेळा तारखांमध्ये बदल केला आहे. भाजप मतचोरी करून महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.
महापालिकेत भाजपचे ५० ते ५५ नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या संपर्क दौऱ्यांच्या वेळी केला होता. त्यामुळे सत्ता भाजपचीच राहणार असल्याचे ते म्हणत आहेत. लोकसंख्या कमी व मतदार वाढविले जात असल्याने पालकमंत्री व भाजपचे नेते विजयाचे स्पष्ट संकेत देत असल्याचे मुन्ना राठोड म्हणाले.
शेगांव-रहाटगांव प्रभागात २७ हजार ४५७ लोकसंख्या असून दुरुस्ती मतदार ३३ हजार ७६७ आहेत. संत गाडगेबाबा-पीडीएमसी प्रभागात लोकसंख्या २६ हजार ९५२ तर दुरुस्ती मतदार २५ हजार ४३८ आहेत. नवसारीमध्ये ३० हजार ७० लोकसंख्या तर दुरूस्ती मतदार ३६ हजार ९२९ आहेत.सूतगिरणी -सामरा नगरमध्ये ३१ हजार १८४ लोकसंख्या असतांना मतदार ४० हजार ११३ आहेत. जुनी वस्ती बडनेरामध्ये लोकसंख्या ३२ हजार १५ असतांना मतदार घटले असून ही संख्या ३१ हजार ६४४ झाली आहे. यामुळे मतदार यादीत घोळ करून महापालिका काबीज करण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोप मुन्ना राठोड यांनी केला आणि मतदारांची आकडेवारीच पत्रकार परिषदेत जाहीर केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी