
लातूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात घेण्यात आली.
दर्पण मराठी पत्रकार संघ, लातूर प्रस्तूत गणपत वेणुगोपाल कुलकर्णी लिखीत व दिग्दर्शित ‘अंतरछिद्र-द ब्लॅक होल’ या दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. हे नाटक मनाची पकड घेत प्रसंगाची उत्कंठा वाढवणारे ठरले.
‘अंतरछिद्र’ ही एक कथा आहे. डॉ. अभिजीत या यशस्वी पण अंतर्मनातून तुटलेल्या न्युरोलॉजिस्टची. त्याच्या आयुष्यात सगळं आहे. काम, वैवाहिक जीवन, पत्नी, नंदिनीचं नितळ सहजीवन. परंतु, एका रात्री सर्वकाही बदलून जाते. आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या १८ वर्षांच्या मुलीची प्रकृती अचानक गंभीर होते. ताण, थकवा आणि चुकीच्या क्लिनिकल अंदाजाच्या दडपाणखाली डॉ. अभिजीत क्षणभरात निर्णय घेतो आणि तीव्र गोंधळात चिता व्हेंटिलेटर स्वत: काढतो. मुलीचा मृत्यू त्याच क्षणी होते. त्या दिवसानंतर डॉ. अभिजीतच्या अंतरंगात एक भयंकर अपराधभाव निर्माण होतो. बाहेरुन तो पूर्वीसारखाच काम करीत असतो. पण, आतून एक अंधार.
या गिल्टीच्या सावलीत त्याच्या मनात भ्रम निर्माण होऊ लागतात. नंदिनी जिवंत असली तरी तिचं एक भावनिक भूतकाळातून तयार झालेलं सावलीरुप त्याला दिसू लागतं. जणु तिच्या मृत्यूचं ओझच तो वाहतो आहे, असा भास होऊ लागतो. तिचा आवाज, तिची पावलं, तिच्या शंकेतल्या टोचणी सगळं त्याच्या गिल्टीचं प्रतिफल बनतं. त्याच वेळी दिगंबर नावाचं एक विचित्र, अस्पष्ट, -हस्यमय व्यक्तिमत्व त्याच्या आयुष्यात येऊ लागतं. दिगंबर कधी आयसीयुमधला रुग्ण वाटतो, कधी तत्वज्ञानाचा आवाज, कधी त्याच्या काऊंन्सेंन्सचं रुप आणि कधी काळेख्या भूतकाळाची जिवंत सावली.
‘अंतरछिद्र’ ही एक माणसाच्या मनातल्या काळ्या भोव-याची कथा आहे. एका चुकीच्या निर्णयाने निर्माण झालेल्या मानसिक खाईची. ही कथा दाखवते की, अपराधभाव माणसाला कसा सावल्यांत ढकलतो, ओळखी पुसून टाकतो आणि शेवटी वास्तव व भ्रम यांच्या सीमारेषा पूर्णपणे मोडून टाकतो आणि या अंतर्मनातील काळ्या रिकाम्या जागेचं नाव आहे-‘अंतरछिद्र’. मनोविश्लेषणात्मक शैलीने अभिनयाची उंची वाढवणारे जबरदस्त नाटक नाट्यरसिकांची उत्कंठा वाढवणारे ठरले.
अरुण बारस्कर(डॉ. अभिजीत), अर्पणा गोवंडे-कुलकर्णी (नंदिनी) आणि अमोल गोवंडे(दिगंबर) या तिघांभोवती ‘अंतरछिद्र-द ब्लॅक हो’ हे नाटक फिरते. त्या व्यतिरिक्त या नाटकात मीनल वाघमारे (नर्स) व विवेक मगर(एक माणुस) ही दोन पात्रेही आहेत. स्थानिक लेखकाची नवी संहिता जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा कथासार नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरला. हळूवार अभिनय, कसलाही उथळपणा, भडकपणा नाही. मनाच्या खोल डोहातून येणारी संहितेची भाषा मनाची पकड घेत प्रसंगाची उत्कंठा वाढवत होती. अभिनयात अपर्णा गोवंडे व अमोल गोवंडे हे दोघेही सुक्ष्म बारकावे टिपत होते. अरुण बारस्कर यांनी अस्वस्थ मानसिकता घेताना अनेक जागा खुप चांगल्या घेतल्या.
दिग्दर्शक म्हणून गणपत वेणुगोपाल कुलकर्णी यांनी सर्वच पात्र उत्तमरित्या हाताळली. विवेक मगर यांचे नेपथ्य सूचक पण प्रभावी होते. अश्विन देसाई यांचे पार्श्वसंगीत अप्रतिम राहीले. गणपत वेणुगोपाल कुलकर्णी यांची प्रकाश योजना लाजवाब होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis