
पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या निषेधार्थ ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे. याचा निर्णय पुण्यात पार पडलेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेत घेण्यात आला.
मार्केट यार्ड येथील ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’च्या व्यापार भवन सभागृहात व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत राज्यभरातील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम), चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड, ग्रेन, राईस, ऑइल सीड मर्चंट्स असोसिएशन (मुंबई), तसेच दि पूना मर्चंट्स चेंबरकडून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
बाजार समितीतील कायदे, राष्ट्रीय बाजार समिती प्रस्तावित धाेरणातील त्रुटी, तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये व्यापाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिषदेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु