
नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी मणिपूरला पोहोचणार आहेत. 2023 मध्ये राज्यात जातीय हिंसा उसळल्यानंतर हा त्यांचा पहिला दौरा असणार आहे. संघटनातील एका पदाधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
आरएसएसचे राज्य महासचिव तरुण कुमार शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भागवत आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात नागरिक, उद्योजक आणि आदिवासी समुदायांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. शर्मा म्हणाले, “आमच्या सरसंघचालकांचा हा दौरा आरएसएसच्या शताब्दी कार्यक्रमाशी संबंधित आहे. ते 20 नोव्हेंबरला गुवाहाटीहून येतील आणि 22 नोव्हेंबरला रवाना होतील.”
संघातील आणखी एका पदाधिकाऱ्याने सांगितले की दोन वर्षांपूर्वी हिंसा भडकल्या नंतर हा भागवत यांचा पहिला दौरा असेल. त्यांनी शेवटचा मणिपूर दौरा 2022 मध्ये केला होता. शर्मा यांनी सांगितले की या भेटीदरम्यान प्रमुख नागरिक, आदिवासी समुदाय प्रतिनिधी आणि युवा नेत्यांसोबत स्वतंत्र संवाद सत्रांचे आयोजन केले जाईल.शर्मा पुढे म्हणाले, “आगमनाच्या दिवशी ते इंफाळच्या कोनजेंग लाइकाई येथे उद्योजक आणि इतर प्रमुख व्यक्तींना भेटतील. 21 नोव्हेंबरला भागवत मणिपूरच्या डोंगराळ भागातील आदिवासी नेत्यांशी चर्चा करतील.”
जेव्हा विचारण्यात आले की आरएसएस प्रमुख त्या राहत छावण्यांना भेट देतील का, जिथे गेल्या दोन वर्षांपासून विस्थापित लोक राहतात, तेव्हा शर्मा म्हणाले, “सध्या ते कार्यक्रमात समाविष्ट नाही. हा दौरा मुख्यतः संघटनेच्या अंतर्गत कार्यक्रमाचा भाग आहे.”
मे 2023 पासून मणिपूरमध्ये मेती आणि कुकी-झो समुदायांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात 260 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. राज्य विधानसभा, ज्याचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, ती निलंबित करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode