
सोलापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
अनगर नगरपंचायतीत माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला होता. पण अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी थिटे यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं तो अर्ज बाद झाला. यानंतर राजन पाटील यांच्यासह समर्थकांनी मोठा जल्लोष केला. या जल्लोषावेळी राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत अजित पवार, नाद करायचा पण अनगरकरांचा नाही असं चॅलेंज दिलं होतं. या विधानावरून आता बाळराजे पाटलांचे वडील राजन पाटील यांनी माफी मागितलीय.
बाळराजेंच्या विधानानंतर सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला होता. प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटलं होतं की, गल्लीच्या राजकारणात रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबूटिंबू बाळानं अजितदादांवर बरळणं म्हणजे इतभर लाकूड आणि हातभर ढलपी असं आहे. विजयाचा उन्माद करताना अनगरच्या बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय. गर्विष्ठ माना झुकतील.
विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर राजन पाटील यांनी लेकानं दिलेल्या आव्हानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी पवार कुटुंबियांची माफीही मागितलीय. राजन पाटील म्हणाले की, आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नाही. तरुण मुलं उत्साहात असतात आणि यावेळी निवडणूक झाली. बिनविरोध होताच तरुणांनी उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला. आमच्या मुलानं तिथं जे काही वक्तव्य केलं मी त्याचं समर्थन करणार नाही. राजकारणाच्या दृष्टीने तो लहान आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून नकळत अशा प्रकारचं वक्तव्य गेलं असल्याने त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो.
राजन पाटील यांनी म्हटलं की, मी आज जरी मोठ्या पवार साहेबांपासून, अजितदादांपासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजितदादा कारणीभूत आहेत, असं मी समजणार नाही. त्यामागे अनेक कारणं आहेत. तरीही मी त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. आतापर्यंत जे वैभव उभं केलंय त्यात मोठ्या साहेबांचा, अजित दादांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या मुलाच्या तोंडून नकळत, उत्साहात, भावनेत जे अपशब्द आले ते यत्किंचितही व्हायला नको होते. त्याबद्दल अजितदादांचं व्यक्तीशः आणि पवार परिवाराची मी अंत:करणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, मोठ्या साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड