रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी
रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्ययुद्धात अफाट पराक्रम, शौर्य गाजवले. राणीने २२ वर्षांत मोठे कार्य केले. महिला असूनही तिने स्वातंत्र्यासाठी मोठा संग्राम केला. विद्यार्थिनी व महिलांनी राणीच्या पराक्रमाचा आदर्श घ्यावा
कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाईंची जयंती चांदोर येथे साजरी


रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्ययुद्धात अफाट पराक्रम, शौर्य गाजवले. राणीने २२ वर्षांत मोठे कार्य केले. महिला असूनही तिने स्वातंत्र्यासाठी मोठा संग्राम केला. विद्यार्थिनी व महिलांनी राणीच्या पराक्रमाचा आदर्श घ्यावा. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ गेली दहा वर्षे शाळांमध्ये जाऊन झाशीच्या राणीची जयंती साजरी करत आहे व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेऊन राणीचे चरित्र पोहोचवत आहे, ही एक कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त चांदोर शाळा क्र. १ मध्ये बुधवारी विद्यार्थ्यांच्या क्रीडा व हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी नेवाळकर यांनी झाशीच्या राणीच्या इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले की, चांदोर व कोट गावाची हद्द एक आहे. राणीचे माहेर तांबे घराण्यात व झाशीच्या गंगाधरभाऊ नेवाळकर यांच्याशी झाला. नेवाळकर कुटुंब देश-विदेशात पोहोचले आहे. त्यांची सातवी पिढी आज झांशीवाले असेही आडनाव जोडून लावते. नेवाळकरांच्या कुटुंबात माझा जन्म झाला, याचा अभिमान वाटतो.

प्रास्ताविकामध्ये संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर म्हणाले की, झाशीची राणी या शौर्याचे प्रतिक आहे. हे शौर्य बालपणापासूनच मुलांमध्ये आले पाहिजे, याकरिता राणीचे चरित्र वाचले गेले पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये झाशीच्या राणीची जयंती गेली १० वर्षे साजरी करीत आहोत. राणीचे चरित्र देताना क्रीडा, कला प्रकारच्या स्पर्धा शाळांमध्ये घेऊन त्यांना रोख बक्षीस देतो.

कोटच्या सरपंच निशिगंधा नेवाळकर म्हणाल्या की, कोट येथे झाशीच्या राणीचे स्मारक होणार आहे. त्यावेळी सर्वांनी येथे जरूर भेट द्यावी. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी झाशीच्या राणीचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.याप्रसंगी अॅड. प्रिया लोवलेकर यांनी राष्ट्रनिष्ठा व देश प्रथम या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे सांगितले.

कार्यक्रमाला चांदोरच्या सरपंच पूनम मेस्त्री, कोटच्या सरपंच व राणीच्या घराण्यातील सौ. निशिगंधा नेवाळकर, शाळा समिती अध्यक्ष योगेश पड्यार, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष मानस देसाई तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande