
पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
सहकार भारतीचे संस्थापक सरचिटणीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जनसेवा सहकारी बँकेचे पहिले कार्यकारी संचालक आणि अनेक नागरी सहकारी बँकांचे सल्लागार, मार्गदर्शक वसंत नारायण देवधर (वय ९१) यांचे आज राहत्या घरी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे त्यांचे पुतणे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पूर्व राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, आनंद आणि विवेक देवधर आहेत.
महाराष्ट्रातील अनेक बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. महाराष्ट्राबरोबरच त्यांनी आसाममध्ये देखील नागरी बँक सुरू केली होती. संघाच्या घोष वादनामध्ये देखील त्यांचा विशेष हातखंडा होता. घोषाच्या भारतीय रचना बनवण्यात याव्यात यासाठी ते आग्रही होते. संघकार्य आणि सहकार चळवळीशी संबंधित असंख्य पुस्तके, अहवाल, जुने रेकॉर्ड त्यांनी जपून ठेवले होते. विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु