
कोल्हापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणूकीच्या निमित्ताने आज आणखी एक राजकीय खळबळ उडवणारी घटना घडली. मंत्री हसन मुश्रीफ यांचे बंधु अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेसह इतर महिला उमेदवारांनी माघार घेतली.
एकमेकाचे कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांची कालच युती झाल्याने त्याची जिल्हयात मोठी चर्चा झाली.
आज बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी कागलमधील प्रभाग नऊ मधून दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधु माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नुरजहाँ निसार नायकवडी व अपक्ष मोहबतबी अब्दुलरशीद शेख यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची अताषबाजी करीत विजयाच्या घोषणा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar