
हिंगोली, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
' जिल्ह्यातील 'माय भारत केंद्र' हे युवकांसाठी दिशादर्शक ठरणारे असून या संधीचा लाभ युवा वर्गाने घेऊन राष्ट्रीय स्वाभिमान व एकात्मता साधून आत्मनिर्भर भारत निर्माण करावा, असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले.
येथील माय भारत केंद्राच्या वतीने एकात्मता युनिटी मार्च पदयात्रेतून एकतेचा जयघोष, राष्ट्रीय अभिमान आणि स्वावलंबनाचा संदेश घेऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून पदयात्रेचा प्रारंभ करताना जिल्हाधिकारी गुप्ता बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माय भारत केंद्राचे आदर्श युवा पुरस्कार्थी पत्रकार डॉ.विजय निलावार, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, समाजसेविका सुनीता मुळे मंचावर उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकातून केंद्र प्रमुख अनिल ढेंगे यांनी योजनाबद्दल माहिती दिली. पदयात्रेची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केल्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची व आत्मनिर्भर भारतची शपथ जिल्हाधिकारी गुप्ता तर व्यसन मुक्तीची शपथ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपस्थित युवक-युवतींना दिली. ही पदयात्रा शिवाजीराव देशमुख सभागृहात पोहचली.त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे, डॉ. विजय निलावार आदींच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर हिंगोली माय भारत केंद्राच्या माध्यमातून युवकांनी मजल मारली असून भविष्यातही हिंगोली जिल्ह्याचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करून शुभेच्छा दिल्या. 1993 ला मला या केंद्राने आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक पुरस्काराचा मानकरी ठरलो तसे तुम्हा युवक-युवतींबाबत या उपक्रमातून व्हावे, अशा शुभेच्छा देऊन डॉ. निलावार यांनी अपेक्षा व्यक्त केल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात युवक युवती नि सांघिक व वैयक्तीक रंगदार उत्स्फूर्त कला प्रदर्शन केले. प्रथम पारितोषिक भारतीय विद्या मंदिरच्या ललाटी भंडारा, गोंधळ या नृत्याला, द्वितीय अनुसया विद्या मंदिरच्या अंबाबाई गोंधळाला यावे या उपक्रमाला, तिसरे पारितोषक तिसरे सरजुदेवी भिकुलाल भारूका विद्यालयातील लावणी नृत्याला, उत्तेजनार्थ कु.माही घुगे, हर्षदा कुगावकर याना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व मेडल्स देऊन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या सर्व उपक्रमात व कार्यक्रमात हिंगोली जिल्हा स्काऊट गाईडचे स्वयंसेवक व प्रमुख माधुरी दळवी, सरजुदेवी भारुका विद्यालयाचा एन.सी.सी.कॅडेट व विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना, आदर्श महाविद्यालय, न्यू मॉडर्न कॉलेज, खाकीबाबा इंग्लिश स्कूल, भारतीय विद्यामंदिर, अनुसया विद्या मंदिर आदी सर्व निमंत्रित सहभागी झाल्याने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे केंद्र प्रमुख अनिल ढेंगे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.किशोर इंगोले यांनी केले. शेवटी सामूहिक वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis