
कोल्हापूर, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारांच्या छाननी नंतर माघार घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. पहिल्या दिवशी कागल, पन्हाळा या दोन नगरपरिषदेत प्रत्येकी एका उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
कागलमधील प्रभाग ९ मधून दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सेहरनिदा मुश्रीफ या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधु माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नुरजहाँ निसार नायकवडी व अपक्ष मोहबतबी अब्दुलरशीद शेख यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली.
तर पन्हाळा मधील प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण गटातून सतीश भोसले पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत शिवशाहु आघाडीचे सर्वेसर्वा सतीश कमलाकर भोसले यांनी जनसुराज्य पक्षाबरोबर युती केली आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण गटातून सतीश भोसले निवडणूक रिंगणात होते. सतीश भोसलेंच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू अशोक, तानाजी भोसले व गजानन कोळी यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने सतीश भोसले यांची बिनविरोध निवड झाली.
सतीश भोसले हे यापुर्वीही नगरसेवक म्हणून २००४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. जनसुराज्य पक्षाकडून पन्हाळा नगरपरिषद बिनविरोध करण्यासाठी आ. विनय कोरे प्रयत्नशील आहेत. पण बहुतेक उमेदवार नॉट रिचेबल आहेत. तर काहीजण परगांवी गेले आहेत. माघारीच्या दिवसाच्या अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न राहणार आहे.बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत माघारीची अंतिम मुदत संपल्या जाहीर केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar