नाशिक - खंडणीखोर संतोष शर्माविरुद्ध आणखी दोन गुन्हे, दोन उद्योजकांकडे मागितली ८ लाखांची खंडणी
नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। - उद्योजक किंवा कंपनी चालकांना त्रास देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या संतोष शर्मा विरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल झाल्याने त्याच्या अडचणींत वाढ झाली आहे. खंडणी मागीतल्याप्रकरणी एका गुन्ह्यात पोलिसांनी त्याला कालच अटक
खंडणीखोर संतोष शर्माविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल, दोघा उद्योजकांकडे मागितली ८ लाखांची खंडणी


नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।

- उद्योजक किंवा कंपनी चालकांना त्रास देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या संतोष शर्मा विरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल झाल्याने त्याच्या अडचणींत वाढ झाली आहे. खंडणी मागीतल्याप्रकरणी एका गुन्ह्यात पोलिसांनी त्याला कालच अटक केली असून त्यानंतर आणखी दोन प्रकरणे उघडकीस आले आहेत.

खंडणीच्या पहिल्या घटनेत फिर्यादी शैलेश अशोक भामरे (वय ४२, रा. पाथर्डी फाटा) यांनी त्यांच्या नील सॉफ्टवेअर सोल्युशन या कंपनीच्या मागील सामासिक जागेमध्ये पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने शेड बांधले होते. हे शेड काढून घ्यावे नाहीतर पाच लाख रुपये खंडणी द्यावी यासाठी संतोष शर्मा व त्याचे तीन साथीदार मे २०२५ पासून भामरे यांना त्रास देत होते.

संतोष शर्मा व त्याच्या साथीदारांनी भामरे यांना धक्काबुक्की करून वाईट साईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. एक दिवस शर्माने फिर्यादी भामरे यांना ग्लॅक्सो कंपनीच्या मागच्या रस्त्यावर अडवून चाकू सारखे

धारदार हत्यार गळ्याजवळ लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शर्माने धमकी आणि एमआयडीसी कार्यालयाकडून कारवाई करण्याची भीती दाखवत भामरे यांच्याकडून आजपर्यंत एक लाख रुपये रोख स्वरूपात घेतलेले होते. उर्वरित चार लाख रुपये घेण्यासाठी तो भामरे यांना वारंवार त्रास देत होता. अखेर भामरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात संतोष शर्मा विरुद्ध फिर्याद दिली आहे.

शर्माने खंडणी मागितल्याची दुसरी घटना अंबड एमआयडीसी परिसरातील सिमेन्स कॉलनी समोर घडली. फिर्यादी राजाराम बुधाजी पानसरे यांनी त्यांच्या कंपनीच्या आतमध्ये कंपनीच्या प्रॉडक्शन करिता कच्चामाल ठेवण्यासाठी बांधकाम केलेले

होते. या बांधकामाचे गुप्तपणे फोटो व व्हिडिओग्राफी करून त्यांच्या मनात दहशत निर्माण होईल म्हणून पोस्टरबाजी करत आरोपी संतोष शर्माने पानसरे यांना धमकविण्यास सुरुवात केली. पानसरे यांच्या विरुद्ध एमआयडीसी कार्यालयात खोटी तक्रार करून ती तक्रार मागे घेण्याकरिता त्याने तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. पानसरे पैसे देण्यासाठी तयार नसल्याने त्यांना सातपूर येथील एमआयडीसी कार्यालयाच्या खाली गाठून दमदाटी करत पानसरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पैसे नाही दिले तर कंपनीची वाट लावण्याची धमकी देखील देऊन त्यांच्यावर कारदेशीर कारवाई करण्याची भीती घालत दीड लाख रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारले. संतोष शर्मा व त्याच्या काही साथीदारांनी मिळून फिर्यादी पानसरे यांच्याकडे एकूण तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी पानसरे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande