
धाराशिव, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनांची शक्यता लक्षात घेता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १ वाजेपासून ते १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदीचे मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर यांनी जारी केला आहे.
पोलीस अधीक्षक,धाराशिव यांनी दिलेल्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान विविध पक्ष,संघटना,गट यांच्या सभा, कार्यक्रम आणि प्रचारामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.यामुळे पक्षांतर,गटबाजी, आरोप-प्रत्यारोप यामुळे वाद निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे,घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकविमा,नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी,संघटना किंवा इतर व्यक्तींमार्फत अचानक मोर्चे, धरणे,उपोषणे,रास्तारोको,आत्मदहन यांसारख्या आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
शस्त्र,काठी,तलवार,बंदूक,लाठ्या किंवा शारीरिक इजा करणाऱ्या वस्तू जवळ बाळगणे,कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगडफेकासाठी साधने साठवणे किंवा तयार करणे,उत्तेजक भाषणे, विडंबन,असभ्य कृती,समाजात तणाव निर्माण करणारे फलक/चित्रे जवळ बाळगणे,संविधानिक मूल्यांना बाधा आणणारी घोषणे,गाणी,वाद्य वाजवणे,मानवी किंवा अन्य आकृती/प्रतिमा प्रदर्शन,पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावास परवानगीशिवाय एकत्र येणे,मिरवणुका किंवा मोर्चे काढणे या बाबींना प्रतिबंधात्मक आदेशानुसार मनाई केली आहे.
अंत्ययात्रा,धार्मिक विधी,लग्न समारंभ,सामाजिक सण,शासकीय कार्यक्रम,शासकीय कार्यरत कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे (सिनेमागृहे,रंगमंच इ.) यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
सभा,मोर्चा किंवा निवडणूक प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास,संबंधित व्यक्तींनी पोलीस अधीक्षक धाराशिव किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी (धाराशिव/तुळजापूर/उमरगा/कळंब/भूम) यांच्याकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी मिळाल्यानंतरच संबंधित कार्यक्रमांसाठी जमावबंदी लागू राहणार नाही.अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis