
पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीमार्फत झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणात अनियमितता आढळल्याप्रकरणी आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे.तसेच, हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.मात्र, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेले अधिकारी हेच या गैरव्यवहारात सामील असल्याने चौकशी प्रक्रिया निष्पक्ष राहिलेली नाही आणि ती मुद्दामहून गुंडाळली जाण्याची शक्यता आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.यासंदर्भात आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की, मुंढवा जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला असून शासनाच्या मालकीची जमीन खासगी व्यक्तींना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी संगनमत केलेलं आहे. तसेच चौकशीसाठी नेमलेले अधिकारी सुद्धा या प्रकरणात सहभागी असल्याने या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी व गुन्हे नोंदवण्यात यावेत.पुढे त्यांनी असंही म्हटलंय की, या संपूर्ण प्रकरणात शासनाचे काही अधिकारी आणि राजकीय नेते थेटपणे किंवा अप्रत्यक्षरित्या सामील असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेले अधिकारी हेच या गैरव्यवहारात सामील असल्याने चौकशी प्रक्रिया निष्पक्ष राहिलेली नाही आणि ती मुद्दामहून गुंडाळली जाण्याची शक्यता आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु