
कॅनबेरा, 20 नोव्हेंबर (हिं.स.)पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या अॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या अंतिम अकरा क्रिेकेटपटूंची घोषणा केली आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणार असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघ जेक वेदरल्ड आणि ब्रेंडन डॉगेट या दोन नवीन चेहऱ्यांना कसोटी पदार्पणाची संधी दिली आहे . हा निर्णय संघ व्यवस्थापनाच्या नवीन आक्रमक रणनीतीता भाग म्हणून पाहिले जात आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियाचा सामना वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर इंग्लंडशी होत असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिया कायमस्वरूपी सलामीवीराच्या शोधात आहे. आता निवड समितीने जेक वेदरल्डवर विश्वास ठेवला आहे. तो उस्मान ख्वाजासोबत डावाची सुरुवात करणार आहे. यामुळे स्टीव्ह स्मिथ आणि संघाला स्पष्ट संदेश गेला आहे की, ते मार्नस लाबुशेनला वरच्या क्रमांकावर बढती देण्याऐवजी एका विशेषज्ञ सलामीवीराला प्राधान्य देतात. वेदरल्ड हा ख्वाजाबरोबर येणारा सहावा सलामीवीर असेल. वॉर्नर गेल्यापासून हा क्रमांक सतत बदलत आहे.
कॅरिबियन दौऱ्याला मुकलेला मार्नस लाबुशेन त्याच्या पसंतीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर परतेल. कॅमेरॉन ग्रीनला पुन्हा पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली आहे, ज्यामुळे तो त्याची अष्टपैलू भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकेल. ग्रीनने दुखापतीनंतर पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे. पण त्याला संघाचा भविष्यातील क्रमांक चार मानला जात आहे. या बदलाचा अर्थ असा आहे की, सलग सात कसोटी सामने खेळणाऱ्या ब्यू वेबस्टरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाज ब्रेंडन डॉगेटचे पदार्पण आधीच निश्चित मानले जात होते, कारण जोश हेझलवुड हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. स्टार्क, लिऑन आणि बोलँडसह डॉगेट ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना नवीन प्रेरणा देतील. २०१९ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया एकाच कसोटीत दोन पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटूंना मैदानात उतरवणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: जेक वेदरल्ड (पदार्पण), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लिऑन, स्कॉट बोलँड, ब्रेंडन डॉगेट (पदार्पण).
इंग्लंडचा १२ जणांचा संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), मार्क वूड.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे