
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।घरी एकट्याच राहणाऱ्या ६५ वर्षीय कस्तुरे आजीबाईंना सायबर गुन्हेगारांनी डिजिटल ॲरेस्ट करून तब्बल ४३ लाख लुबाडले आहेत. ४ ते १३ नोव्हेंबर या काळात सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल ॲरेस्ट केल्याचे सांगून तेवढी रक्कम उकळली. आजीबाईंनी बॅंकांमधील तीन ‘एफडी’ मोडून रक्कम दिली. या बाबत आता सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे.
तुमच्या सीमकार्डचा वापर एका गुन्ह्यात झाला असून तुमच्यावर मुंबई क्राईम ब्रॅंच व सीबीआयकडे गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी सुरू असून तुम्हाला लगेच मुंबईला यावे लागेल, अन्यथा अटक केली जाईल’ असे सांगून सायबर गुन्हेगारांनी कस्तुरे आजीबाईंना भीती घातली. कोणाला यासंदर्भात सांगितले तर त्यांनाही अटक होऊ शकते, असेही ठणकावून सांगितले. त्यामुळे त्यांनी सोलापुरातच राहणाऱ्या आपल्या मुलीला काहीही सांगितले नाही. आई संपर्कात नसल्याने मुलगी घरी गेली. त्यावेळी ती गप्पच होती, घाबरलेली दिसली. तिने आईला विचारले, जावयांनीही विचारले. त्यावेळी त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी आईला धीर देत पोलिसांत तक्रार केली.बॅंकेतून घरी येईपर्यंत सायबर गुन्हेगारांचा व्हिडिओ कॉल सुरूच होता. कस्तुरे या बॅंकेत जाऊन शेवटचे ९ लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बॅंक खात्यात ‘एनईएटी’ करीत होत्या. पण, फॉर्मवरील ‘आयएफसी’ कोड त्यांच्याकडून चुकला आणि ती रक्कम ट्रान्सफर होऊ शकली नाही. सायबर गुन्हेगारांनीही त्यांना पुन्हा संपर्क केला नाही. त्यामुळे कस्तुरे यांचे नऊ लाख रुपये बचावले, असे सायबर पोलिसांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड