नाकोडा ज्वेलर्स घरफोडी - नेपाळ सीमेवरून चार आरोपी ताब्यात; सुरतमध्ये एकाला अटक
पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। पालघर येथील अंबर शॉपिंग मॉलमधील नाकोडा ज्वेलर्सवर झालेल्या तीन कोटींहून अधिकच्या घरफोडी प्रकरणातील पाच आरोपींपैकी चार जणांना नेपाळ सीमेवरून तर एका आरोपीला सुरतमधून अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या
नेपाळ सीमेवरून चार आरोपी ताब्यात; सुरतमध्ये एकाला अटक – नाकोडा ज्वेलर्स घरफोडी प्रकरणाचा तीन दिवसांत उलगडा


पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

पालघर येथील अंबर शॉपिंग मॉलमधील नाकोडा ज्वेलर्सवर झालेल्या तीन कोटींहून अधिकच्या घरफोडी प्रकरणातील पाच आरोपींपैकी चार जणांना नेपाळ सीमेवरून तर एका आरोपीला सुरतमधून अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 3 कोटी 28 लाख 18 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही चोरी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. चोरट्यांनी ज्वेलर्स शेजारील कपड्याच्या दुकानाचे शटर तोडून, सामायिक भिंत फोडत ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील लोखंडी तिजोरी गॅस कटरच्या साहाय्याने कापून 5 किलो 420 ग्रॅम सोने, चांदीचे दागिने आणि 20 लाखांची रोख रक्कम, असा एकूण 3 कोटी 72 लाख 35 हजार 460 रुपयांचा ऐवज ते घेऊन फरार झाले होते.

तांत्रिक तपासादरम्यान आरोपी हे नेपाळचे रहिवासी असून त्यांनी गुजरातमार्गे नेपाळकडे पलायन केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्वरित उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील नेपाळ सीमेकडे रवाना झाले. तेथे सुरक्षा दलांच्या मदतीने चार मुख्य आरोपींना सीमेवरून ताब्यात घेण्यात आले. तर एक आरोपी सुरतमधून अटक करण्यात आला.

पोलिसांच्या जलदगती तपासामुळे अवघ्या तीन दिवसांत या मोठ्या चोरीचा उलगडा झाला असून चोरी गेलेल्या मुद्देमालाचा मोठा हिस्सा परत मिळाला आहे. या कारवाईबद्दल पालघर पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande