
नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।
- शासकीय जमीन कमी दरात खरेदी करून देतो, अशी दिशाभूल करून एका भामट्याने महिलेला २४ लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही देवळाली कॅम्प येथील विजयनगर परिसरात राहते. आरोपी सुशांत दिनकर काकड (रा. सुळेवाडी रोड, मखमलाबाद, पंचवटी) हा दि. १ जून २०२२ रोजी फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादी महिलेला शासकीय जमीन कमी दरात खरेदी करून देतो, अशी दिशाभूल करून आमिष दाखविले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी महिलेने आरोपीला रोख रक्कम, तसेच त्याच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी रक्कम देण्यास भाग पाडले. त्यानुसार या महिलेने आरोपीने सांगितल्याप्रमाणे त्याला एकूण २३ लाख ७६ हजार ७४० रुपये दिले; मात्र बरेच दिवस होऊनही काकड याने महिलेला जमीन खरेदी करून दिली नाही. त्यामुळे फिर्यादीने काकड याच्याकडे रक्कम परत मागितली; मात्र काकड याने ही रक्कम परत न देता फिर्यादीच्या घरी गुंड पाठवून मारहाण करण्याची धमकी दिली. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब पीडित महिलेच्या लक्षात आली. हा प्रकार दि. १ जून २०२२ ते दि. १ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सुशांत काकड या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV