
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।ताडकळस पोलिसांनी चंदन तस्करी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत तट्टुजवळा परिसरातून सहा आरोपी ताब्यात घेतले.चंदन चोरी करून विक्रीसाठी नेत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मोटारसायकल, चंदन लाकूड आणि साहित्य असा एकूण २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताडकळस–पिंगळी रस्त्यावर तपासणी सुरू असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सतीश तावडे, राम सोळंके, राहुल वडमारे यांनी ही कारवाई केली.या कारवाईत मेहताब खॉ अहेमद खॉ पठाण, सय्यद अहमद सय्यद मुर्तुजा (३६), शेख आलिम शेख जानी (३२), शेख कलीम शेख पाशा, शेख फारूख शेख लतिफ, बबलू खदीर शेख (सर्व रा. वसमत, जि. हिंगोली) यांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून ६४,४०० रुपये किमतीची चंदन लाकडे, ३ लोखंडी कुर्हाडी, धार देण्याचे साहित्य आणि मोटारसायकल (क्र. MH-26 BU-5593) असा एकूण १,२४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी चोरटी चंदन तोड करून विक्रीसाठी नेत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलिस अंमलदार राहुल वडमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार बालाजी रणेर व भगवान चोरघडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis