
मुंबई, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। हॉलिवूडचा अॅक्शन स्टार ड्वेन जॉनसनच्या बहुप्रतिक्षित ‘जुमांजी 3’ चित्रपटाचे पहिले पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आले असून, सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. जेक कॅस्डन दिग्दर्शित हा चित्रपट जुमांजी फ्रँचायझीतील आतापर्यंतचा सर्वात भव्य चित्रपट ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर, नव्या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे.
‘जुमांजी 3’चे अधिकृत पोस्टर शेअर करताना मेकर्सनी कॅप्शन दिलं आहे, “पाहा, कोण राहिलंय जुमांजी मूव्हीत!”. पोस्टरमध्ये केविन हार्ट, ड्वेन जॉनसन, करेन गिलन आणि जॅक ब्लॅक आपल्या जुन्या अवतारामध्ये दिसत आहेत. पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
एका यूजरने लिहिलं, “याला ‘जुमांजी: द फाइनल बॉस’ असं नाव ठेवलं पाहिजे!”, तर दुसरा युजर म्हणतो, *“पुन्हा एकदा खऱ्या जगात परतलो!” अशा उत्साही प्रतिक्रिया उमटत आहेत. आणखी एका प्रतिक्रियेत म्हटलं आहे, “हे आता खऱ्या जगात आलेत…”
मिळालेल्या माहितीनुसार, ‘जुमांजी 3’ ख्रिसमस 2026 च्या सुमारास प्रदर्शित होणार आहे. फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक रोमांचक भेट ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर