
मुंबई, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। अभिनेता ते निर्माता असा प्रवास केलेल्या पंकज त्रिपाठी यांच्या कॉमेडी-ड्रामा वेब सीरिज ‘परफेक्ट फॅमिली’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. 8 भागांची ही सीरिज असून नेहा धूपिया, गुलशन देवैया, मनोज पहवा, सीमा पहवा आणि गिरिजा ओक हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजचे निर्माण अजय राय आणि मोहित छब्बा यांनी संयुक्तपणे केले आहे. सुमारे 2 मिनिटे 48 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये ह्यूमरसोबत भावनिक क्षण आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता अशा घटकांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
‘परफेक्ट फॅमिली’चा ट्रेलर जार पिक्चर्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आला आहे. कथानक कर्करिया कुटुंबाभोवती फिरते, ज्यांना त्यांच्या लहान नातीशी संबंधित घडलेल्या एका प्रसंगानंतर थेरपीची मदत घ्यावी लागते. भारतातील ही पहिली लाँग-फॉर्म वेब सीरिज असल्याचं सांगितलं जात आहे. या सीरिजचा प्रीमियर 27 नोव्हेंबर रोजी थेट यूट्यूबवर होणार आहे. सुरुवातीचे दोन एपिसोड प्रेक्षकांसाठी मोफत उपलब्ध असतील, तर उर्वरित भाग पाहण्यासाठी 59 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केल्या भावना
निर्मितीक्षेत्रात पदार्पण करताना पंकज त्रिपाठी यांनी आपल्या भावना शेअर केल्या. ते म्हणाले की ‘परफेक्ट फॅमिली’ त्यांच्यासाठी अत्यंत जवळची आणि मनाला भिडणारी संकल्पना आहे. यूट्यूबवर सीरिज रिलीज करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगत त्यांनी हे प्लॅटफॉर्म मोठ्या आणि दर्जेदार कंटेंटसाठी उत्तम माध्यम ठरत असल्याचं मत व्यक्त केलं.
त्यांच्या मते, डिजिटल रिलीज मॉडेल हा नव्या काळाचा गरजेनुसार तयार झालेला मार्ग आहे. काही काळापूर्वी आमिर खानची ‘सितारे ज़मीन पर’ हीा चित्रपटही अशाच पद्धतीने थेट यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर