
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। ॲड. राजेश श्रीमंत कांबळे (वय ४५, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ कार्यालयाजवळ, सोलापूर) यांचा खून झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी संजय ऊर्फ बंटी महादेव खरटमल, ॲड. सुरेश चव्हाण व श्रीनिवास येलदी यांच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर दोन साक्षीदारांची महत्त्वाची साक्ष झाली.
गुन्ह्यातील साक्षीदार नाझिया सोहेल चौधरी हिने बंटी हा घराशेजारी राहत होता. ११ जून २०१९ रोजी बंटीच्या घरातून घाण वास येत होता, अशी साक्ष नोंदविली. तसेच साक्षीदार पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड यांनीही साक्ष नोंदविली. बंटीने गुन्हा केल्यावर मृत ॲड. कांबळेंची गाडी अक्कलकोट स्टेशन येथे लावली होती. त्याने लपवून ठेवलेली गाडी व चावी काढून दिली. त्याचा पंचासमक्ष पंचनामा केला, अशी साक्ष नोंदवली.
उलट तपासात साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली. खटल्याची पुढील सुनावणी उद्या होणार आहे. खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी आणि संशयित आरोपींतर्फे ॲड. राजेंद्र फताटे, ॲड जयदिप माने काम पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड