
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हिं.स.)स्विस टेनिस स्टार रॉजर फेडररला एका महत्त्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली आहे. हा सन्मान फेडररला आपल्या पात्रतेच्या पहिल्याच वर्षात मिळणर आहे. पुरुष एकेरी प्रकारात २० वेळा ग्रँडस्लॅम विजेता फेडरर हा २०२६ च्या वर्गासाठी पाठिंबा मिळवणारा एकमेव उमेदवार होता. फेडररने राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच सारख्या महान टेनिसपटूंच्या युगाचे वर्णन टेनिससाठी सुवर्णकाळ म्हणून केले.
पाच वर्षे टूरपासून दूर राहिल्यानंतर टेनिसपटूंना निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकते आणि त्यांची निवड ७५ टक्के मतदान गटाने करावी लागते. ज्यामध्ये टेनिस मीडिया, इतिहासकार, उद्योग नेते, हॉल सदस्य आणि चाहते यांचा समावेश आहे. हॉल मतदानाचे निकाल जाहीर करत नाही. टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि पत्रकार आणि माजी टेनिसपटू मेरी कॅरिलो यांची योगदानकर्त्या श्रेणीत निवड झाली. त्यांना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्याचा समारंभ ऑगस्टमध्ये होणार आहे.
फेडरर म्हणाला, मी नेहमीच टेनिसच्या इतिहासाचे आणि माझ्या आधी आलेल्यांनी मांडलेल्या उदाहरणांचे कौतुक केले आहे. या खेळातून आणि माझ्या समवयस्कांकडून अशा प्रकारे ओळख मिळणे हे अद्भुत आहे. करिअर ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आठ टेनिसपटूंपैकी फेडरर एक आहे. त्याने विम्बल्डनमध्ये आठ, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहा, अमेरिकन ओपन पाच आणि फ्रेंच ओपनचे एकदा विजेतेपद पटकावले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे