
मुंबई, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। ‘फुकरे’ फेम पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच त्यांचा नवीन चित्रपट ‘राहु-केतु’चा अधिकृत टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात अमित सियालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून, चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन विपुल विग यांनी केले आहे. टीझरवरून स्पष्ट होते की या वेळी विपुल यांनी कथेत अंधश्रद्धा, नकारात्मकता आणि कॉमेडी यांचा रोचक संगम साधला आहे.
१ मिनिट ५६ सेकंदांचा हा टीझर Zee Studios च्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आला आहे. पुलकित आणि वरुण यांनी साकारलेले ‘राहु’ आणि ‘केतु’ हे दोन पात्र गावकऱ्यांच्या दृष्टीने अशुभ मानले जातात. असा समज आहे की हे दोघे ज्या कोणाच्या आयुष्यात पाऊल टाकतात, त्याच्या जीवनात दुर्दैवाची मालिका सुरू होते. याच अंधश्रद्धेभोवती ही विनोदी कथा फिरत जाते, ज्यात त्यांच्या अशुभ छबीमुळे ते अनेक मजेशीर आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकताना दिसतात.
टीझरमध्ये पुलकित–वरुण यांची जुनी ट्यूनिंग, हलकेफुलके डायलॉग्स आणि कॉमिक टायमिंग पुन्हा अनुभवायला मिळते, ज्यावरून चित्रपट मनसोक्त मनोरंजन देणार असल्याची खात्री मिळते.
‘राहु-केतु’ हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि अमित सियालसोबत शालिनी पांडे व चंकी पांडे याही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर