गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून १ लाख ६० हजारांचा गंडा
नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल भरले नाही, तर कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवून एका इसमाने एका वृद्धाला मोबाईलची लिंक पाठवून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या
गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून १ लाख ६० हजारांचा गंडा


नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल भरले नाही, तर कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवून एका इसमाने एका वृद्धाला मोबाईलची लिंक पाठवून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुनील छबूराव मगरे (रा. रेवती अपार्टमेंट, गंगापूर रोड, नाशिक) हे दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी होते. त्यावेळी महेश जोशी नामक इसमाने त्यांना व्हॉट्सअॅप क्रमांकावर इंग्रजीमध्ये एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल भरले नाही, तर रात्री नऊ वाजता कनेक्शन बंद करण्यात येईल, असा मेसेज पाठवून भीती दाखविली. नंतर अन्य मोबाईल क्रमांकांवरून

एमएनजीएल कंपनीतर्फे बोलतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अन्य एका मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर बिल-अपडेटची फाईल पाठवून सात रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादीने ती फाईल डाऊनलोड केल्याने व त्यावर डेबिट कार्डाची माहिती भरण्यास सांगितली. त्यानुसार फिर्यादीने माहिती भरल्यानंतर फिर्यादीच्या कॅनरा बँक शाखेतून त्यांच्या संमतीशिवाय प्रथम सात रुपये डेबिट झाले. त्यानंतर लगेच पाच हजार रुपये, पुन्हा पाच हजार, त्यानंतर ४९ हजार ५२० रुपये, त्यानंतर १ लाख १ हजार ६० रुपये असे डेबिट होऊन फिर्यादीची एकूण १ लाख ६० हजार ५८८ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात महेश जोशी नामक इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande