
चंद्रपूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोरा निरीक्षक पथकाने येनसा ते सोसायटी (मजरा) जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करून चारचाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक होत असलेला परराज्यातील व बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला. जप्त मद्य आणि वाहनाची एकूण किंमत अंदाजे 6 लक्ष 40 हजार इतकी असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर हायवेवर वरोरा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. शॉवरलेट कंपनीच्या ग्रे रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH49-AS-0647 ची तपासणी करण्यात आली असता वाहनाच्या डिक्कीत रॉयल स्टॅग ब्रँडच्या 180 मिलीच्या 480 बॉटली, रॉयल चॅलेंज ब्रँडच्या मध्यप्रदेश निर्मित 750 मिलीच्या 24 बॉटली (प्रथमदर्शनी बनावट) असा परराज्यातील व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्यसाठा आढळून आला.
या प्रकरणी मनीष नंदकीशोर जयस्वाल (वय 48, नागपूर), विशाल शंभू मंडळ (वय 28, सावनेर, जि. नागपूर), सतीश नामदेव देवकर (वय 31, वरोरा, जि. चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव