चॅटजीपीटी ग्रुप चॅट सुविधा सुरू
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। ओपनएआयनं आपल्या चॅटजीपीटी अ‍ॅपमध्ये ग्रुप चॅट ही नवी सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केली आहे. आता फ्री, गो, प्लस आणि प्रो अशा सर्व प्लॅनधारकांना जगभरातून ही सेवा वापरता येणार आहे. या सुविधेमुळे मित्र-परिवार किंवा
ChatGPT Group Chat Feature


मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। ओपनएआयनं आपल्या चॅटजीपीटी अ‍ॅपमध्ये ग्रुप चॅट ही नवी सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केली आहे. आता फ्री, गो, प्लस आणि प्रो अशा सर्व प्लॅनधारकांना जगभरातून ही सेवा वापरता येणार आहे. या सुविधेमुळे मित्र-परिवार किंवा सहकारी मंडळींसोबत जेवणाचं प्लॅनिंग, प्रवासाचं आयोजन किंवा कोणतंही संयुक्त काम करताना चॅटजीपीटी स्वतः एक सदस्य म्हणून सहभागी होऊन मदत करेल. वापरकर्ते या ग्रुपमध्ये लिंकद्वारे इतरांना आमंत्रित करू शकतात आणि झटपट प्रोफाईल सेटअप करून कोणालाही सहभागी होता येतं.

ग्रुप चॅट तयार करण्यासाठी चॅटजीपीटी मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईट उघडल्यावर वरच्या उजव्या बाजूला दिसणारं “Add People” बटन निवडावं लागतं. त्यानंतर “Start Group Chat” पर्याय निवडल्यानंतर खास ग्रुप लिंक तयार होते आणि ती लिंक इतरांना शेअर करता येते. लिंकवर क्लिक करणारी व्यक्ती लगेच प्रोफाईल तयार करून ग्रुपमध्ये प्रवेश करू शकते.

या ग्रुपमध्ये जीपीटी-5.1 ऑटो मॉडेल वापरलं जातं जे वापरकर्त्याच्या प्लॅननुसार योग्य मॉडेल निवडून उत्तरं देते. सर्च, फोटो-फाइल अपलोड, इमेज जनरेशन आणि व्हॉइस डिक्टेशन यासारख्या सर्व आधुनिक सुविधा यात उपलब्ध आहेत. सदस्य “ChatGPT” असा उल्लेख करून एआयला कधीही बोलावू शकतात आणि चॅटजीपीटीला कधी उत्तर द्यायचं किंवा कधी शांत राहायचं हे स्वयंचलितपणे समजतं. तो इमोजी रिअ‍ॅक्शन्स देऊ शकतो आणि सदस्यांच्या प्रोफाईल फोटोनुसार वैयक्तिक उत्तरही देऊ शकतो. रेट लिमिट फक्त चॅटजीपीटीच्या उत्तरांवर लागू होतं, सदस्यांच्या परस्पर संवादावर नाही.

गोपनीयतेच्या दृष्टीनं ही चॅट पूर्णपणे स्वतंत्र असते. वापरकर्त्यांची वैयक्तिक चॅटजीपीटी मेमरी इथे वापरली जात नाही आणि ग्रुपमधून कोणतीही नवी मेमरी तयार होत नाही. प्रत्येक ग्रुपसाठी स्वतंत्र कस्टम इन्स्ट्रक्शन्स सेट करून चॅटजीपीटीचा संवादाचा टोनही ठरवता येतो. 18 वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी संवेदनशील सामग्री आपोआप मर्यादित ठेवली जाते आणि पॅरेंटल कंट्रोलद्वारे ग्रुप चॅट पूर्णपणे बंद करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

ही सुविधा जगभरात सर्वांसाठी खुली झाल्यानं सहकार्याने काम करणे, समूह नियोजन आणि मनोरंजन अधिक सोपं व स्मार्ट झालं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande