
पणजी, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय चित्रपट, तंत्रज्ञ आणि देशोदेशीचे निर्माते, चित्रपट यांच्यात व्यवसायाच्या दृष्टीने संवाद घडवून आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने दादासाहेब फाळके चित्रनगरीने सहभाग घेतला आहे. यंदा गोवा येथे सुरू असलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सहभाग घेतला असून येथे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाच घर या दोन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे या करिता महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी घेतला जातो. गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सहभागाचे हे अकरावे वर्ष आहे. अशा प्रकारे सातत्याने या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेऊन मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य ठरले आहे. यंदा संकेत माने दिग्दर्शित मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि श्री. मिलिंद कवडे दिग्दर्शित श्री गणेशा अशा दोन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन फिल्म बाजारमध्ये करण्यात येणार आले. महोत्सव कालावधीपर्यंत निवडक चित्रपट रसिकांना पूर्व नावनोंद करून चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रपट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महामंडळातर्फे बाजार विभागात मुक्काम पोस्ट देवाच घर आणि श्री गणेशा या दोन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चित्रनगरीचा स्टॉल ठरतोय आकर्षणाचे केंद्र.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेनुसार गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महत्त्वाच्या बाजार विभागात स्टेट/ कंट्री पॅव्हेलियन मध्ये महामंडळाचा आकर्षक स्टॉल उभा करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे चित्रपटकर्मींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, बाजार विभागात सहभागी झालेले दोन्ही चित्रपट आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विविध उपक्रमांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या शिवाय एन डी स्टुडिओची देखील माहिती देण्यात येत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर