
नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
कब्जे वहिवाटीत असलेल्या कुळाच्या मिळकतीच्या जमिनीस नावे लावून देण्याच्या बहाण्याने एका इसमाने वृद्धाची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुरेश प्रभाकर घुगे (रा. हौसाई अपार्टमेंट, मखमलाबाद नाका) यांचे जावई योगेश कराड व किशोर कराड यांची कब्जे वहिवाटीत असलेल्या कुळाच्या मिळकतीची जमीन आहे.
या जमिनीस नावे लावून देण्याकरिता आरोपी गणेश सदाशिव खेडकर (रा. शिवनगर, मखमलाबाद नाका, पंचवटी) याने फिर्यादी घुगे यांच्याकडून जानेवारी ते १९ नोव्हेंबर या कालावधीत फोन पेद्वारे व रोख स्वरूपात १५ लाख रुपये घेतले; मात्र आरोपी खेडकर याने कुळाच्या मिळकतीस आजपर्यंत नावे लावून दिली नाही, तसेच घेतलेली रक्कम परत न करता आरोपी घर सोडून कुठे तरी निघून गेला आहे. फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV