
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लिमिटेडने रॅपिड चार्जिंग तंत्रज्ञानात अग्रस्थानी असलेल्या एक्स्पोनंट एनर्जीसोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली असून, देशातील ई-रिक्षा, ई-कार्गो कार्ट तसेच एल-3 व एल-5 श्रेणीतील इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांसाठी केवळ 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारे सर्वात जलद चार्जिंग सोल्युशन उपलब्ध होणार आहे.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शहरी आणि अर्ध-शहरी भागांतील लास्ट-माइल मोबिलिटी ऑपरेटर्सचे दैनंदिन ऑपरेटिंग तास व उत्पन्न 30 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या सहयोगामुळे कायनेटिक ग्रीनच्या लोकप्रिय एल-3 मालिका – सेफर स्मार्ट, सेफर शक्ती आणि सुपर डीएक्स या मॉडेल्समध्ये आता 15 मिनिटांत 100 टक्के चार्ज होण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच एल-5 श्रेणीतील हाय-स्पीड लॉजिस्टिक्स व्हेईकल ‘सेफर जंबो लोडर’ आणि आगामी एल-5 एम पॅसेंजर व्हेरिएंटमध्येही हे प्रगत तंत्रज्ञान बसवलं जाणार असून, चालकांना कमी वेळेत अधिक ट्रिप घेता येणार व मालक-चालकांच्या कमाईत मोठी वाढ होणार आहे.
एक्स्पोनंट एनर्जीचा फूल-स्टॅक प्लॅटफॉर्म अत्याधुनिक बॅटरी, स्मार्ट चार्जिंग नेटवर्क आणि इंटेलिजंट सॉफ्टवेअर वापरतो. यात बॅटरीवर 3,000 सायकल्सची उद्योगातील सर्वोच्च वॉरंटी दिली जाते, ज्यामुळे वाहनाचे आयुष्य व पुनर्विक्री मूल्य दोन्ही वाढते. देशभरातील एक्स्पोनंटची 160 पेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन तत्काळ कायनेटिक ग्रीनच्या ग्राहकांसाठी उपलब्ध होत असून, पुढील 12 महिन्यांत ही संख्या मेट्रो, टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये मोठ्या वेगाने वाढवण्याची योजना आहे.
कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या की, हे सहयोग भारतीय ई-थ्री-व्हीलर उद्योगासाठी गेम-चेंजर ठरणार आहे आणि देशातील पहिले 15 मिनिटांचे फूल चार्ज सोल्युशन ई-रिक्षा व कार्गो कार्टमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे ऑपरेटर्सना अपेक्षेपेक्षा जास्त अपटाइम व कमाई मिळेल आणि परवडणारी, सोयीस्कर वाहतूक उपलब्ध करण्याचे आमचे ध्येय अधिक गती घेईल.
एक्स्पोनंट एनर्जीचे सीईओ अरुण विनायक यांनी सांगितले की, ईव्ही स्वीकारण्यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे चार्जिंगसाठी लागणारा वेळ असून, आमचे तंत्रज्ञान ही समस्या कायमची दूर करते. कायनेटिक ग्रीनसोबतची भागीदारी आम्हाला संपूर्ण ई-थ्री-व्हीलर बाजारात रॅपिड चार्जिंग प्लॅटफॉर्म विस्तृत करण्यास मदत करणार आहे. या सहकार्यामुळे कायनेटिक ग्रीनला एल-3 आणि एल-5 श्रेणीतील बाजारपेठेत आपले नेतृत्व अधिक बळकट करता येणार असून, भारतीय इलेक्ट्रिक तीनचाकी उद्योगात कंपनीची पकड अधिक मजबूत होईल असा विश्वास दोन्ही कंपन्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule