मेक्सिकोची फातिमा बॉश फर्नांडिस मिस युनिव्हर्स २०२५ ची मानकरी
बँकॉक, 21 नोव्हेंबर (हिं.स.) - यंदा मेक्सिकोच्या फातिमा बॉश फर्नांडिसने मिस युनिव्हर्स २०२५ ची मानकरी ठरली आहे. फातिमाला मिस युनिव्हर्स २०२४ व्हिक्टोरिया थेलविगने मुकुट घातला. भारताच्या मनिका विश्वकर्माने उत्कृष्ट कामगिरी केली आणि टॉप ३० मध्ये पोहो
फातिमा बॉश मिस युनिव्हर्स


फातिमा बॉश मिस युनिव्हर्स


बँकॉक, 21 नोव्हेंबर (हिं.स.) - यंदा मेक्सिकोच्या फातिमा बॉश फर्नांडिसने मिस युनिव्हर्स २०२५ ची मानकरी ठरली आहे. फातिमाला मिस युनिव्हर्स २०२४ व्हिक्टोरिया थेलविगने मुकुट घातला. भारताच्या मनिका विश्वकर्माने उत्कृष्ट कामगिरी केली आणि टॉप ३० मध्ये पोहोचली, परंतु टॉप १२ मध्ये स्थान मिळवण्यात तिला अपयश आले. चार फेऱ्यांनंतर स्पर्धेत थायलंडची प्रवीनर सिंह दुसऱ्या क्रमांकावर आली, तर व्हेनेझुएलाची स्टेफनी अब्साली तिसऱ्या क्रमांकावर आली. फिलीपिन्सची अतिसा मनालो चौथ्या क्रमांकावर आणि कोट डी'आयव्होअरची ओलिव्हिया यासे पाचव्या क्रमांकावर आली.

थायलंडमधील बँकॉक येथे मिस युनिव्हर्स स्पर्धा होती. पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये प्रश्नोत्तरांची फेरी झाली. मेक्सिकोच्या फातिमा बॉशला विचारण्यात आले की, तुमच्या दृष्टिकोनातून, २०२५ मध्ये महिलांसाठी आव्हान काय आहे आणि जगभरातील महिलांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी तुम्ही मिस युनिव्हर्सच्या किताबाचा कसा वापर कराल? याला उत्तर देताना फातिमा बोश म्हणाली, एक महिला आणि मिस युनिव्हर्स म्हणून, मी माझा आवाज आणि माझी शक्ती इतरांची सेवा करण्यासाठी वापरेन, कारण या काळात, आपण बोलण्यासाठी, बदल घडवण्यासाठी आणि गोष्टी स्पष्टपणे पाहण्यासाठी येथे आहोत. आपण महिला आहोत आणि धाडसी महिलाच उभ्या राहतात आणि इतिहास घडवतात.

कोण आहे फातिमा बॉश?

२५ वर्षांची फातिमा बॉश फर्नांडिस ही टबास्को येथील सॅंटियागो दे टिपा शहरातील रहिवासी आहे. ती टबास्कोची पहिली मिस युनिव्हर्स मेक्सिको ठरली होती. फातिमाने १३ सप्टेंबर रोजी ग्वाडालजारा येथे हा किताब जिंकला होता. फातिमाने मेक्सिकोमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. फातिमा बॉश एक मॉडेल आणि डिझायनर आहे. तिने २०१८ मध्ये टबास्को येथे ‘फ्लोर दे ओरो’ हा किताब देखील जिंकला होता.

तिच्या विजयानंतर मिस युनिव्हर्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये फातिमा बॉश खूप भावूक झालेली दिसली. तसेच तिच्या डोक्यावर असलेला ताज तिच्या सौंदर्याला अधिक आकर्षक बनवत होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांकडून बॉश यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना या किताबसाठी योग्य मानले जात आहे. फातिमाच्या या विजयाने चाहते भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर 'तीच या किताबाची खरी हकदार' अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने या वर्षीच्या बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, विजेत्याला सुमारे २,५०,००० डॉलर्स देण्यात येतील. ही रक्कम २०२४ च्या विजेत्या व्हिक्टोरिया केजरला देण्यात आलेल्या रकमेइतकीच आहे. बक्षिसाबरोबरच यंदाच्या मिस युनिव्हर्सला महिन्याला ५०,००० डॉलर वेतन दिले जाते. हे वेतन प्रवास, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती आणि मिस युनिव्हर्स ब्रँड अंतर्गत केलेल्या इतर अॅक्टिव्हिटीजसाठी असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande