
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)
अमरावती येथील आघाडीचा बास्केटबॉल खेळाडू पारस विटाळकर याची १७ वर्षांखालील राष्ट्रीय बास्केटबॉल संघात सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. पोलीस कर्मचारी विजय विटाळकर यांचा मुलगा असलेल्या पारसच्या या निवडीमुळे अमरावती शहराला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या बास्केटबॉल संघाने कांस्यपदक पटकावले होते. या यशात पारसचे महत्त्वपूर्ण योगदान होते, ज्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात नियमित सराव करणाऱ्या या संघाने राज्य स्पर्धेत नागपूर विभागाला ५९-५८ आणि नाशिक विभागाला ६७-४३ अशा फरकाने हरवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. पारस विजय विटाळकर याने प्रत्येक सामन्यात तब्बल ३० ते ४० गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तो येथील टायटन्स स्कूलचा विद्यार्थी असून, नैतिक देशमुख, राज चौकंडे, वंश राठी, यश पळसपगार, हरतेज माथरू, अर्चित खंडारे, सोहम धोटे, दीपा जीना आणि अमितेश गुजर या सहकाऱ्यांनीही त्याला चांगली साथ दिली.या यशाबद्दल अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पारसचे कौतुक केले आहे. तसेच, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, टायटन्स पब्लिक स्कूलचे अध्यक्ष नितीन धांड, प्राचार्य डॉ. अजय चौबे, अमरावती बास्केटबॉल संघटनेच्या अध्यक्ष माधुरीताई चेंडके आणि प्रशिक्षक धनंजय विटाळकर व निलेश फुलंबरकर यांनीही पारससह संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी