
लातूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। अहमदपूर येथील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेचा एक उत्कृष्ट नमुना समोर आला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची विक्रमी कामगिरी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सामान्यतः असा तपास पूर्ण करून दोषारोप दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला किमान तीन महिन्यांचा कालावधी मिळतो. मात्र, अहमदपूर पोलिसांनी ही वेळमर्यादा झुगारून अत्यंत जलदगतीने काम पूर्ण केले.
अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं ७५३/२०२५ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. रोकडासावरगाव येथील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या सासूबाईंसोबत शेताकडे पायी जात असताना, आरोपी विठ्ठल नळगीरे याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या फिर्यादीचा हात धरून त्यांना शेतातील तुरीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या ओरडण्याने त्यांची सासूबाई धावत आल्याने आरोपी तेथून धमकी देऊन पळून गेला.
गुन्हा दाखल होताच, पोहेकों/९१७ विनोद पवार यांनी तपास अधिकारी म्हणून तात्काळ सूत्रे हाती घेतली. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार पोलीस उप- निरिक्षक रवि बुरकुले यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास सुरू केला.
विनोद पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, फिर्यादीचा कलम १८३ बीएनएसएस प्रमाणे कोर्टात जबाब नोंदवला आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (फिर्यादीच्या सासूबाई) यांचे टिपण घेतले. सर्व महत्त्वाचे पुरावे, कागदपत्रे आणि ओळखपत्रे गोळा करण्यात आली. आरोपीस कायदेशीर नोटीस देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कारवाई केली व त्याचे हमीपत्र आणि समजपत्र घेण्यात आले.
केवळ २४ तासांत तपास पूर्ण करून, आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलीस निरिक्षक रायटर हनुमंत (बाळु ) आरदवाड पोलीस कॉन्स्टेबल सतीश चव्हाण यांनीही या तपासामध्ये मोलाची मदत केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis