
सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य सरकारने १९ जुलै २०१२ पासून गुटखा, मावा विक्रीवर बंदी घातली. तरीपण, कर्नाटकच्या सीमेवरील सोलापूर शहर-जिल्ह्यात दरवर्षी सरासरी दीड ते दोन कोटींचा गुटखा, मावा जप्त होतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील गुटखा विक्रेत्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई संदर्भातील विचारणा विधी व न्याय विभागाकडे करण्यात आली आहे. याशिवाय सध्या भारतीय न्याय संहितेतील कलम १२३ नुसार इतरांना विष खाऊ घालण्याच्या कारणाखाली कारवाई होणार आहे. त्यात संबधितास दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.शाळा-महाविद्यालयापासून १०० मीटर अंतरात गुटखा, मावा, सुगंधित तंबाखू, सिगारेट अशा वस्तूंच्या विक्रीवर विशेष निर्बंध आहेत. मात्र, शहरी भागात कायदा पायदळी तुडविला जात असल्याची स्थिती आहे. दरम्यान, सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने १ जानेवारी ते १० नोव्हेंबरपर्यंत शहर-जिल्ह्यातून ८२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तरीपण, शहर-जिल्ह्यात किमान १५०० ठिकाणी गुटखा, मावा विक्री बिनधास्तपणे सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड