

मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। विवोच्या सब-ब्रँड आयकूनं आपला पुढचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आयक्यूओओ 15 भारतात लाँच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. तर 20 नोव्हेंबरपासून सांयकाळी 6 वाजल्यापासून या फोनची प्री-बुकिंग सुरू झाली असून अधिकृत लाँच 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कंपनीकडून लाँच ऑफर्ससह या फोनची किंमत 65,000 ते 70,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
आयक्यूओओ 15 मध्ये सॅमसंगचा अगदी नवा 2K M14 LEAD OLED डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा 2,600 निट्स पीक ब्राइटनेस आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे. फोनला स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 चिपसेट, LPDDR5x Ultra RAM, UFS 4.1 स्टोरेज आणि 8,000 चौ. मिमी सिंगल-लेयर व्हेपर चेंबर थर्मल सिस्टीम मिळते. भारतात प्रथमच आयकूचा फोन Android 16 आधारित OriginOS 6 सोबत येणार असून 5 वर्षे मोठे OS अपडेट्स आणि 7 वर्षांची सिक्युरिटी पॅचेसची हमी देण्यात आली आहे.
कॅमेरा विभागात आयक्यूओओ 15 ट्रिपल 50 मेगापिक्सेल रिअर सेटअपसह येतो. यात सोनी IMX921 मुख्य सेन्सर, IMX882 पेरिस्कोप टेलिफोटो (3x ऑप्टिकल झूम) आणि 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. फ्रंटला 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गेमिंगसाठी कंपनीने सुपरकॉम्प्युटिंग चिप Q3 आणि ड्युअल-अॅक्सिस व्हायब्रेशन मोटर दिली आहे. नवीन “गेम लाइव्ह स्ट्रीमिंग असिस्टंट” फीचरमुळे अतिरिक्त हार्डवेअरची गरज न पडता लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर थेट स्ट्रीमिंग शक्य होणार आहे.
बॅटरीमध्ये 7,000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून 100 वॅट वायर्ड आणि 40 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे. फोन दोन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध होईल—अल्फा (ब्लॅक) आणि लिजेंड (व्हाईट).
Amazon आणि आयक्यूओओ India ई-स्टोअरवर आज दुपारी 12 वाजल्यापासून प्री-बुकिंगसाठी Priority Pass मिळू शकतो ज्यात iQOO TWS 1e ईयरबड्स मोफत दिले जातील तसेच अतिरिक्त 12 महिन्यांची एक्स्टेंडेड वॉरंटी मिळणार आहे. गेमिंग, कॅमेरा आणि बॅटरी लाइफ या तिन्ही बाबतीत आयक्यूओओ 15 भारतीय ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरणार असून लाँचनंतर त्याची सरळ स्पर्धा OnePlus 13, Xiaomi 15 आणि Realme GT 7 Proशी होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule