
सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापुरात क्रूझरचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. टायर फुटल्यानंतर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी उलटली. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापुरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण उळे या गावचे असल्याची माहिती समोर येतेय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदुर गावाजवळ क्रूझर गाडीचे टायर फुटले. यामुळे भीषण अपघात होऊन पाच जण मृत्यूमुखी पडले. यात तीन महिलांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. तर मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
सोलापूरहून नळदुर्गच्या दिशेनं देवदर्शनसाठी भाविक जात होते. त्यावेळी क्रूझरचा टायर फुटून गाडी पलटी झाली. यानंतर गाडी ट्रॅक्टरला जाऊन धडकली. क्रूझरच्या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. स्थानिकांकडून घटनास्थळी पोलिसांना मदतीसाठी सहकार्य झालं.
अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली. तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलेत. या अपघाताची नोंद पोलिसात झाले असून अधिक तपास केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड