अंबरनाथ - शिवसेना उमेदवाराच्या वाहनाची धडक, चौघांचा मृत्यू
- चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कारवरील नियंत्रण सुटले- घटना सीसीटीव्हीत कैद अंबरनाथ, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - भरधाव कार चालविणाऱ्या चालकाने तीन दुचाकीस्वारांना अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर चिरडले. या अपघाताचा थरार सीसीटीव्ह
अंबरनाथ अपघात


- चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कारवरील नियंत्रण सुटले- घटना सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - भरधाव कार चालविणाऱ्या चालकाने तीन दुचाकीस्वारांना अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर चिरडले. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, एक दुचाकीस्वार थेट पुलाखाली जाऊन कोसळला. तर कारचाही पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर कारनं तीन दुचाकीस्वारांना चिरडलं. अपघातात सहभागी असलेल्या कारमध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किरण चौबे देखील उपस्थित होत्या. चौबे यांच्या टाटा नेक्सन गाडीने चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. कारचा चालक लक्ष्मण शिंदेला कार चालवत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं कारवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एक दुचाकीस्वार कारच्या धडकेनंतर उडून पुलाखाली पडल्याचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे. मृतांमध्ये अंबरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव (रा. अंबरनाथ), चंद्रकांत अनारसे (रा. अंबरनाथ), सुमीत चेलानी (रा. उल्हासनगर) आणि लक्ष्मण शिंदे (रा. अंबरनाथ पूर्व) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारनं अंबरनाथ पूर्वेकडून अंबरनाथ पश्चिमेकडे मटका चौकाचे अलीकडे पुलावर रॉंग साईडने येऊन चार दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघातात तिघेजण जखमी आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande