शशि थरूरांच्या पोस्टवरून भाजपचा काँग्रेसला टोला
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेस नेते शशि थरूर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या भेटीवर केलेल्या पोस्टनंतर भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते र
शशी थरूर


नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेस नेते शशि थरूर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या भेटीवर केलेल्या पोस्टनंतर भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना हा ‘संदेश’ समजेल का ? असा सवाल भाजपने विचारलाय.

थरूर यांनी अमेरिकेत राजकीय सहकार्याचे प्रदर्शन करत ट्रम्प व ममदानी यांच्या व्हाईट हाऊस मधील भेटीचे कौतुक केले. या भेटीत ट्रम्प यांचे कडवे टीकाकार ममदानी यांनी नव्या पदभारानंतर राष्ट्रहितासाठी सहकार्यासाठी हात पुढे केला. यावर प्रतिक्रिया देताना थरूर म्हणाले की, मतदारांचा कौल स्वीकारणे आणि देशाच्या व्यापक हितासाठी एकत्र काम करणे हेच लोकशाहीचे खरे तत्त्व आहे. ट्विटर (एक्स) संदेशात थरूर म्हणाले की, लोकशाही अशीच चालली पाहिजे. निवडणुकीत विचारांच्या लढाईत जोशात सहभागी व्हा; पण निवडणूक निकाल लागल्यानंतर, जनतेने दिलेला जनादेश स्वीकारा आणि ज्या देशाची सेवा करण्याची तुम्ही दोघांनी प्रतिज्ञा केली आहे, त्या देशाच्या हितासाठी परस्पर सहकार्य करायला शिका. मला भारतातही असेच पाहायला आवडेल आणि मी माझी भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे थरूर यांनी नमूद केलेय.

थरूर यांच्या या पोस्टला निवडणूकानंतर राजकीय सहकार्याची मोठी अपील मानत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. थरूर यांची पोस्ट टॅग करत ते म्हणाले की, शशि थरूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला आठवण करून दिली आहे की, भारताला प्राधान्य दिले पाहिजे कुटुंबाला नाही. लोकशाही मार्गाने वागायला हवे, पराभूतांच्या मानसिकतेने नव्हे. पण राहुल गांधींना हा संदेश मिळेल का ? असा खोचक प्रश्न पुनावाला यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, भाजपने थरूरांच्या विधानांवरून काँग्रेसवर टीका करणे हे नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भाषणाचे थरूर यांनी केलेले कौतुक काँग्रेसला मान्य झाले नव्हते. काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनी तर थरूरांना “पाखंडी” म्हणत प्रश्न केला होता की, “तुम्ही मग काँग्रेसमध्ये का आहात ?” काँग्रेसकडून नेहमीच असे म्हटले जाते की, थरूर यांची मते ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही. काही प्रसंगी तिरुवनंतपुरमचे हे खासदार विरोधी नेत्यांचे कौतुक करत असल्याने काँग्रेस त्यांच्यापासून सावध अंतर ठेवताना दिसते.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande