बीडमध्ये उपमुख्यमंत्री पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील चौघे जखमी
बीड, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज, शनिवारी दुपारी धारूरवरून केजकडे जात असताना, त्यांच्या ताफ्यातील ऑक्सिजन गाडी (MH 02 GH 5732) चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवली. त्यामुळे भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला (MH 44 V
अजित दादांच्या ताफ्यातील गाडीमुळे भीषण अपघात..


बीड, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज, शनिवारी दुपारी धारूरवरून केजकडे जात असताना, त्यांच्या ताफ्यातील ऑक्सिजन गाडी (MH 02 GH 5732) चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवली. त्यामुळे भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला (MH 44 V 1518) ताफ्यातील ऑक्सिजन टँकर असलेल्या वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे आणि त्यांच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री पवार धारूरवरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धूनकवड फाटा परिसरात अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या धडकेत ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही. ताफ्यातील गाड्यांचा वेग, अचानक आलेली दुचाकी, रस्त्यावरील गर्दी यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येते. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेमुळे तेलगाव-धारूर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ताफ्यातील गाड्यांच्या वेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, एका सामान्य कुटुंबावर आलेल्या या संकटाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन चालक आणि वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande