
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। हॉलिडे सीझनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी गुगलनं मॅप्समध्ये चार महत्त्वाचे अपडेट्स आणले असून हे फीचर्स प्रवासी, रेस्टॉरंट ग्राहक, पर्यटनप्रेमी तसेच इलेक्ट्रिक व्हेइकल चालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. रेस्टॉरंट बुकिंगपासून ईव्ही चार्जिंग स्टेशनवरील उपलब्धता तपासण्यापर्यंतची सर्व माहिती आता एका क्लिकवर मिळणार असल्याने ट्रॅव्हल प्लॅनिंग अधिक सोपं आणि प्रभावी होणार आहे.
गुगल मॅप्समधील‘Know Before You Go’ या नव्या फीचरमुळे आता एखादं रेस्टॉरंट, हॉटेल किंवा कॉन्सर्ट व्हेन्यू शोधताना सार्वजनिक रिव्ह्यूज आणि ऑनलाइन डेटावर आधारित सारांश स्वरूपातील माहिती स्क्रीनवर दिसेल. रिझर्व्हेशन कसे करावे, मेनूची माहिती, पार्किंगची सोय, स्टाफ सर्व्हिस याबद्दलच्या उपयुक्त टिप्स यामध्ये असणार आहेत. सध्या हे फीचर अमेरिकेत अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून लवकरच जगभरात लागू होणार आहे.
याशिवाय एक्सप्लोर टॅब मध्ये आता जवळपासची ट्रेंडिंग ठिकाणे एका टॅबमध्ये पाहता येतील. लोकप्रिय रेस्टॉरंट्स, पर्यटनस्थळे, अॅक्टिव्हिटीज आणि लोकल इन्फ्लुएन्सर्सच्या क्युरेटेड लिस्ट्समुळे नवीन ठिकाणांची माहिती सहज मिळू शकेल. हे अपडेट या महिन्यापासून अँड्रॉइड आणि आयओएस वर जागतिक स्तरावर उपलब्ध करण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक व्हेइकल मालकांसाठी गुगलनं आणखी एक मोठा बदल जाहीर केला असून आता AI च्या मदतीने चार्जिंग स्टेशनवर पोहोचल्यावर चार्जर रिकामा मिळेल की व्यस्त असेल याची पूर्वकल्पना मिळेल. हा अंदाज ऐतिहासिक डेटा आणि रिअल-टाइम स्टेटसच्या आधारावर असेल, ज्यामुळे प्रवासादरम्यान चार्जिंगसाठी वाट पाहण्याचा प्रश्न सुटणार आहे. हे फीचर पुढील आठवड्यापासून अँड्रॉइड ऑटो आणि गुगल बिल्ट-इन असलेल्या गाड्यांसाठी जागतिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.
तसेच, रिव्ह्यू देण्याच्या प्रणालीतही बदल करण्यात आले आहेत. आता लोकल बिझनेसला रिव्ह्यू लिहिताना आपलं खरं नाव लपवून निकनेम आणि प्रोफाइल फोटो वापरण्याची स्वतंत्रता मिळणार आहे. सार्वजनिकरित्या निकनेम दिसेल, मात्र अकाऊंट गुगलशी लिंक राहणार असून स्पॅम डिटेक्शन सिस्टिम पूर्ववत कार्यरत राहील. हे फीचर या महिन्यात मोबाइल आणि डेस्कटॉपवर जगभर उपलब्ध होईल.या सर्व अपडेट्समुळे गुगल मॅप्स आता फक्त नेव्हिगेशन अॅप न राहता संपूर्ण ट्रॅव्हल प्लॅनर म्हणून विकसित होत असून हॉलिडे ट्रिप्सचा आनंद आणि सोय आणखी वाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule