नथिंग ओएस 4.0 लाँच
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। लंडनस्थित स्मार्टफोन ब्रँड नथिंगने अखेर आपलं बहुप्रतिक्षित अँड्रॉइड 16-आधारित सॉफ्टवेअर अपडेट नथिंग ओएस 4.0 अधिकृतपणे जारी केलं आहे. 21 नोव्हेंबर 2025 पासून हे स्थिर अपडेट टप्प्याटप्प्यानं वापरकर्त्यांना मिळणार असून, ग
Nothing OS 4.0


मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। लंडनस्थित स्मार्टफोन ब्रँड नथिंगने अखेर आपलं बहुप्रतिक्षित अँड्रॉइड 16-आधारित सॉफ्टवेअर अपडेट नथिंग ओएस 4.0 अधिकृतपणे जारी केलं आहे. 21 नोव्हेंबर 2025 पासून हे स्थिर अपडेट टप्प्याटप्प्यानं वापरकर्त्यांना मिळणार असून, गेल्या महिनाभर चालू असलेल्या ओपन बीटा चाचण्यांच्या यशानंतर कंपनीनं सर्वांसाठी ते उपलब्ध केलं आहे.

या अपडेटमध्ये नथिंगनं कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्रित वैशिष्ट्यांवर विशेष भर दिला आहे. नवीन इंटरफेस, सखोल कस्टमायझेशन तसेच दैनंदिन वापर सुलभ करणारी अनेक फीचर्स यामुळं नथिंग ओएस 4.0 हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा अपडेट मानला जात आहे.

नव्या आवृत्तीत एक्स्ट्रा डार्क मोड देण्यात आला असून तो रात्री डोळ्यांचा ताण कमी करतो. पॉप-अप व्ह्यू फ्लोटिंग विंडो, 2×2 क्विक सेटिंग्ज टाइल्स, दोन नवीन लॉक स्क्रीन स्टाइल्स, लॉक ग्लिम्प्स विडगेट, सुधारित सुरक्षा मॉड्यूल आणि नोटिफिकेशन अनुभव देण्यात आला आहे. कॅमेरा विभागातही सुधारणा करत नथिंग फोन 2 मालिकेला फोन 3 मधील स्ट्रेच कॅमेरा मोड देण्यात आला आहे, ज्यामुळे अधिक रुंद आणि शार्प फोटो मिळतात. प्रायव्हसी लक्षात घेऊन फोन 3a मालिकेत लॉक ग्लिम्प्स विडगेट डिफॉल्ट बंद ठेवण्यात आलं असून, इच्छेनुसार वापरकर्ते ते सक्षम करू शकतात.

हे अपडेट सध्या नथिंग फोन (1), फोन (2), फोन (2a), फोन (2a) प्लस, फोन (3a) आणि फोन (3a) प्रो या मॉडेल्सना दिलं जात आहे. पहिल्या आठवड्यात मर्यादित वापरकर्त्यांना अपडेट मिळेल आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत बहुतांश डिव्हाइसपर्यंत पोहोचेल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

नथिंग ओएस 4.0 सोबत कंपनीनं एआय-केंद्रित धोरणात्मक वाटचाल सुरू असल्याचं संकेत संस्थापक कार्ल पेई यांनी दिले आहेत. भविष्यातील अपडेट्समध्ये आणखी स्मार्ट एआय फीचर्स देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे.

नथिंगचे चाहते या अपडेटची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आला आहे. तुमच्या डिव्हाइसवर अपडेट आलंय का? सिस्टम अपडेटमध्ये जाऊन पाहू शकता .

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande